मुसळधार पावसामुळे घराची भिंत व छत कोसळले

जटाशंकर चौकातील घटना, घरमालकाचे मोठे आर्थिक नुकसान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुसळधार पावसामुळे जटाशंकर चौकातील एका घराची भिंत व छप्पर कोसळले. यात घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात घरमालकाचे नुकसान झाले आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत सुमारे 1 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज घरमालकांनी व्यक्त केला असून शासनाने याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

जटाशंकर चौकात वामनघाट रोडवर रेखा मुरलीधर किटकुले या महिला त्यांचा मुलगा, सून व नातवंडासह राहतात. त्यांच्या मुलाचे मोबाईल शॉपी आहे. तर रेखा या घरकाम करतात. शनिवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी रात्री अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. मध्यरात्री पावसाने आणखीनच जोर पकडला. दरम्यान रेखा व त्यांचा मुलगा हे घरात झोपले होते.

पहाटेच्या सुमारास झोपेत असताना त्यांना अचानक मोठा आवाज ऐकू आला. त्यांनी जाऊन बघितले असता त्यांच्या घराची भिंत छप्परासह खाली कोसळल्याचे त्यांना दिसले. या दुर्घटनेत त्यांच्या घरातील टीव्ही, कुलर, कपाट, भांडे इत्यादींचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान सुमारे एक लाखांचे असल्याचा अंदाज आहे.

सुदैवाने जीवित हानी टळली
रेखा यांची सून व नातू हे पोळ्यानिमित्त माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे घरी त्या व त्यांचा मुलगा होता. सुदैवाने घरी त्यावेळा जास्त सदस्य नसल्याने कोणतीही दुर्घटना झाली नाही. वृत्त लिहे पर्यंत प्रशासनातर्फे कुणीही घटनास्थळी भेट दिलेली नव्हती. सदर आपत्तीची नुकसान भरपाई मिळावी अशी घरमालकाद्वारे करण्यात आली आहे.

हे देखील वाचा:

अपघात: रसोया प्रोटिन्समध्ये 50 फुट उंचीवरून पडले कामगार

भामट्याने वृद्ध महिलेला गंडवले, दागिने घेऊन पसार

Comments are closed.