पाकिस्तानात रमली नाही म्हणून देवी आली वऱ्हाडात

हिंगलासपूर येथील ७०० वर्षं जुनं ज्वालामुखी मंदिर

0
सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः वाशीम जिल्ह्याच्या सीमेवर हिंगलासपूर हे केवळ५०० लोकवस्तीचं गाव. हे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येतं. या गावात श्री ज्वालामुखी हिंगलाजदेवीचं प्राचीन मंदिर आहे.

या मंदिराच्या आणि इथल्या उत्सवांच्या आख्यायिका आणि कहाण्यादेखील तेवढ्याच रोमांचक आहेत. यातली एका आख्यायिकेचा संबंध तर थेट पाकिस्तानशी आहे. तुम्हाला वाचून धक्का बसला असेल तरी हे खरं आहे…

पाकिस्तान ते वऱ्हाड प्रवास ब्रह्मदेवामुळे!

बलुचीस्थान (पाकिस्तान) हे या देवीचं मूळ मानलं जातं. ती शेकडो वर्षांपासून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.  तिथे अनेक पूजा आणि षोडशोपचार तिच्यावर होत. नित्योपासनादेखील व्हायची.

असं असलं तरी ज्वालामुखीदेवी ही संतुष्ट नव्हती. तिला तिचा सच्चा भक्त हवा होता. तिने ही अडचण ब्रह्मदेवाजवळ सांगितली. त्यावर ब्रह्मदेवाने तिला वऱ्हाडात जाण्याचा सल्ला दिला. त्या भक्ताच्या शोधार्थ ती बलुचीस्थानातून थेट वऱ्हाडातील अकोली येथे आली.
अकोली हे अकोला जिल्ह्यातील एक छोटंसं खेडं. या गावाजवळ ‘सत्य अरण्य’ नावाचं जंगल होतं. तिथे अमृतगीर महाराज हे ज्वालामुखी हिंगलाजदेवीची घोर तपस्या करत होते. श्री ज्वालामुखी देवीने अमृतगीर महाराजांची मदत घेतली.

मग त्यांना खरा भक्त मिळाला चिमणाजी महाराजांच्या रूपात. देवीचा भक्ताचा शोध संपला. ही आख्यायिका मात्र इथेच थांबत नाही. तिचा पुढचा प्रवास खऱ्या अर्थानं इथून सुरू होतो.

इ.स. 1303मध्ये झाली पूर्तता…

आख्यायिकेनुसार ज्वालामुखी देवी चिमणाजी या भक्ताची परीक्षा घेत राहिली. एकापेक्षा एक अशा कठीण परीक्षांतून चिमणाजींची भक्ती वारंवार सिद्ध होत गेली. चिमणाजी सर्व कसौट्यांवर खरे उतरले. अकोली या गावातील लोक हे दुष्ट प्रवृत्तीचे होते.

त्यामुळे हे गाव सोडावे असा निर्णय ज्वालामुखी देवीने घेतला. शेलुगुंड हे चिमणाजींचे मूळ गाव. त्याच गावाला जाणं देवीला योग्य वाटलं. त्यानुसार या गावातील हनुमान मंदिरात देवीची पालखी आली. परमेश्वराविषयीची भावना बदलली की, परमेश्वर ते स्थानही बदलतो.
देवी ज्वालामुखींनी तसं बोलून दाखवलं. त्यानतुसार सात शिवार असलेल्या जंगलात रात्रीलाच ही पालखी पोहचल्याचं मानतात. त्याच जागेवर इ.स. 1303मधे अमृतगीर महाराजांच्या नेतृत्त्वात भक्त चिमणाजीने भव्य मंदिर बांधलं. देवीच्या प्रवासाची पूर्तता इथं झाल्याचं भाविक मानतात.

परकोटात देवीची स्थापना….चिमणाजी सच्चा आणि निष्ठावान भक्त होता. त्याने देवीसाठी एक-दोन नव्हे तर तीन भव्य परकोट बांधलेत. त्यात विशाल सभामंडप आणि बारदारी दीपमाळ उभारली. अन्य साधक आणि भक्तांसाठी महाकाय विहिरी बांधल्यात.
पावसाळ्यात या विहिरी तुडुंब भरतात. देवीला परमवैभवात ठेवण्याचा चिमणाजीने पूर्ण प्रयत्न केलेत. याच मंदिराला पुढे हिंगलाजदेवी मंदिर म्हणून नावलौकिक प्राप्त झाला. मग या गावाला हिंगलाज देवीच्याच नावावरून हिंगलाजपूर हे नाव पडलं.

दिवसेंदिवस या गावाची कीर्ती पसरायला लागली. भाविकांचा ओढा गावाच्या दिशेने वळायला लागला.

‘गाडपगाड’ उत्सव आणि दोन नवरात्र …..

अश्विन शुद्ध अष्टमीला येथे येथे होम-हवन असे अनेक विधी होतात. चैत्र महिन्यात ‘गाडपगाड’ हा उत्सव होतो. या उत्सवाला अनेक पिढ्यांची परंपरा आहे. या मंदिराचे संस्थापक चिमणाजी सत्ताजी भगत यांनी ही परंपरा सुरू केली असे मानतात.

त्यांच्या पिढीतले परशरामजी बाळाजी भगत यांनी अलीकडच्या काळापर्यंत ही सेवा केली. आता जितेंद्र रामदासजी भगत चैत्र नवरात्रात देवीचा गाडा अथवा रथ ओढतात.

११ बंड्या (बैलगाड्या) यात एकाला एक बांधलेल्या असतात. त्यांना २२ चाकं स्पेशलं लावतात. मंदिरात या उत्सवाला येणारे लोकं त्यात बसतात. एक माणूस हे सर्व ओढतो. बाकी लोक हे बॅलेन्स आणि सपोर्ट करायला सोबत असतात.  
हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी हा अद्भूत सोहळा होतो. यावेळी या गाड्या सजवतात. एकाला एक बांधतात. पूजा वगैरे करून हा कार्यक्रम सुरू होतो. हे काम भक्त करतात. या उत्सवाला प्रचंड गर्दी असते. यावेळी देवीची मोठी पालखी निघते.

भगत परिवार पिढ्यान्-पिढ्या या सेवेत आहे. त्यांच्यानंतर त्यांच्या आठव्या पिढीत रामदासजी परशरामजी भगत आहेत. ही सेवेची माळ 1993मध्ये त्यांच्या गळ्यात घातली. सध्या जितेंद्र रामदासजी भगत देवस्थानाचे व्यवस्थापक आणि सेवाधारी म्हणून कार्यरत आहेत.

भगत परिवारातील राजेश, विनोद, दिलीप, अरुण, प्रसाद, श्रीपाद, पंकज, मनोज, वैभव, भूषण, रोशन, कृष्णा, यश  आणि सर्व सदस्य या सेवेत आहेत. दिवंगत ताराचंदजी केवलचंदजी खत्री यांचे चिरंजीव प्रवीणचंद्र आणि परिवाराने या मंदिराचा 2013मधे जीर्णोद्धार केला.

याचे शिल्पकार नांदेड येथील बालाजी गुंडेराव आप्पा पाटील खेडकर यांनी हे काम पूर्णत्वास नेले. सेवाधारी रामदासजी भगत आणि शिवदास नामदेवरावजी भगत यांनी या कार्यासाठी विशेष योगदान केले.

असं जायचं दर्शनाला…..

चैत्र आणि अश्विन या दोन्ही नवरात्रात विविध कार्यक्रमांची येथे रेलचेल असते. अनेक भक्त इथं वर्षभर दर्शनाला येतात. नवरात्रात इथं भक्तांची विशेष मांदियाळी असते. बडनेराहून अकोला महामार्गावर लोणी गाव आहे.

लोणी गावातून आत हिंगलासपूरसाठी फाटा फुटतो. बडनेरा ते लोणी सहा ते आठ किलोमिटर आहे. तिथून जवळपास 15 किलोमिटरवर हे गाव आहे. दुसया मार्गाने अमरावती ते यवतमाळ मार्गावरील धानोरा गुरववरून पिंपळगाव बैनाई आणि तिथून हिंगलाजपूरला जाता येतं. ‘वणी बहुगुणी’शी बोलताना मंगेश कळसकर यांनी ही माहिती दिली. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.