धक्कादायक…. होम कॉरेन्टाईन व्यक्तीचा वणीत मुक्त संचार
वणीकरांनो सावधान.... भय इथे संपलेले नाही !
जितेंद्र कोठारी, वणी: वणी तालुक्यात कोरोनाबाधित शहरातून तसेच बाहेर जिल्ह्यातून येणा-या व्यक्तींची ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारल्या जात आहे. परंतु शिक्का मारलेली व्यक्ती घराताच राहण्याऐवजी रस्त्यावर फिरत असताना आढळल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
सोमवारी रेडझोन असलेले नागपूर येथून वणी येथे आलेले लक्ष्मीनगर येथील एक युवकाच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असताना सदर व्यक्ती दिवसभर रस्त्यावर फिरत होता. त्यामुळे या भागातील नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली. माहिती दिल्यानंतर तब्बल एका तासाने पथक नांदेपेरा मार्गावर पोहोचले. तो पर्यंत सदर व्यक्ती परत आपल्या घरात गेला होता.
माहितीनुसार होम क्वारंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती ही आपल्या आई व लहान भाऊ सोबत राहत असून त्याचा भाऊ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करीत असल्याची माहिती आहे. दुर्देवाने या कुटुंबात जर कोणी पोजिटिव्ह निघाला तर बाजार समितीत येणाऱ्या शेकडो व्यक्तींना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासनाचा उत्साह मावळला ?
लॉकडाउनच्या सुरुवातीला पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करून नागरिकांना घरात राहण्यास भाग पाडले होते. परंतु मागील काही दिवसांपासून शहरातील नागरिक, वाहनचालक, मॉर्निग वॉक, इव्हनिंग वॉक, व मोकाट फिरणाऱ्या टोळक्यांमध्ये जणू पोलीस विभागाचे अस्तित्व नसल्याचे जाणवीत आहे. पोलीस व प्रशासनाचे एकमात्र लक्ष मास्क न घाळणाऱ्यांकडून दंड वसूल करणे इतकाच राहिल्याचे निदर्शनास आले आहे. 15 – 20 दिवस अहोरात्र कारवाई करून पोलीस व प्रशासनिक अधिकारी थकले की काय ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कोविड -19 पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या शतकाजवळ पोहचली असून जिल्हा रेडझोन घोषित करण्यात आला आहे. परंतु पोलीस व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे येत्या काळात जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वणीकरांनो… भय इथले संपले नाही…
सध्या वणीत एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. त्यातच ज्या व्यक्ती परदेशातून तसेच कोरोनाबाधित शहरातून वणीत आल्या होत्या त्यांचा होम कॉरेन्टाईन काळ संपलेला आहे. निजामुद्दीन येथे गेलेल्या व्यक्तींचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तर वणीकरांनी कोरोनाला गांभीर्याने घेणे सोडले की काय असा प्रश्न पडू शकतो. मात्र काही बाहेरून आलेल्या व्यक्तींचा होम कॉरेन्टाईन काळ अद्यापही सुरू आहे. त्यामुळे हे संकट अद्यापही टळलेले नाही. म्हणून वणीकरांनो सावधान… भय अद्यापही इथले संपलेले नाही.