वणी येथे 79 वा होमगार्ड वर्धापन दिन उत्साहात साजरा

परेडने वेधले वणीकरांचे लक्ष, श्रमदानातून दिला सामाजिक संदेश

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहरात रविवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी होमगार्ड संघटनेचा 79 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. सकाळपासूनच शहराच्या प्रमुख चौकांतून झालेल्या पथसंचलनाने वातावरण भारावून गेले. थोर पुरुषांच्या प्रतिमांना हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तर घोषणांनी शहर दणाणून गेले. त्यानंतर शासकीय मैदान व पोलीस स्टेशन परिसरात श्रमदान करून होमगार्ड जवानांनी समाजसेवेची जाणीव करून दिली.

सकाळी शहरात शिस्तबद्ध पथसंचलन कऱण्यात आले. शिवाजी चौक, अणे चौक, गांधी चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक आणि टिळक चौक या प्रमुख मार्गांवरून होमगार्ड जवानांनी घोषणाबाजी करत पथसंचलन केले. थोर पुरुषांच्या प्रतिमांना हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर शासकीय मैदान व पोलीस स्टेशन परिसरात श्रमदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली. 

होमगार्ड संघटनेचा वर्धापन दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून समाजाशी असलेली नाळ जपण्याचा एक प्रयत्न आहे. पथसंचलनातून शिस्त, श्रमदानातून सामाजिक जबाबदारी आणि घोषणांमधून देशभक्तीचा संदेश देण्यात आला. वणी शहरातील नागरिकांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशी प्रतिक्रिया तालुका समादेशक देवराव बिडकर यांनी दिली. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमात पलटन नायक अधिकारी मंगेश पिंपळकर, विशाल बोरकुटवार, उमेश आवारी, प्रविण पिंपळकर, विवेक चांदेकर यांच्यासह पुरुष व महिला होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले. सूत्रसंचालन प्रमोद मुन व विलास जिवतोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार तालुका समादेशक अधिकारी देवराव बिडकर यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

सदर कार्यक्रम जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अशोक रमेश थोरात यांच्या आदेशानुसार, जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्राचे केंद्रनायक राजेंद्र बनसोड यांच्या मार्गदर्शनात व वणी तालुका समादेशक अधिकारी देवराव बिडकर यांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले. होमगार्ड संघटना ही आपत्ती व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था राखणे, तसेच सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेणारी संघटना म्हणून ओळखली जाते. वर्धापन दिनाच्या निमित्ताने जवानांनी पुन्हा एकदा समाजसेवेची शपथ घेतली.

Comments are closed.