बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील बोरी येथील गदाजी महाराज मंदिरात मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील 25 वर्षांपूर्वी चढविलेल्या चांदीच्या पादुका व चांदीचा घोडा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. अंदाजे 1 किलो वजनाचा हा मुद्देमाल सुमारे 1 लाख रुपये किमतीचा असल्याचे सांगितले जाते. रविवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातच वणी तालुक्यातील वरझळी येथील मंदिराची दानपेटी फोडण्यात आली होती. त्यानंतर ही घटना समोर आली आहे.
फिर्यादी प्रवीण खुशाल उराडे बोरी ता. मारेगाव येथील रहिवासी असून ते गेल्या 20 वर्षांपासून बोरी येथील गदाजी मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत आहेत. 28 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे मंदिरात पूजा केली व ते मंदिराला कुलूप लावून शेतीच्या कामासाठी निघून गेले. संध्याकाळी 6 वाजता ते नेहमीप्रमाणे पुन्हा पूजा करण्यासाठी मंदिरात गेले. मात्र तिथल्या गेटला त्यांना कुलूप दिसले नाही. त्यांनी तत्काळ मंदिराचे सचिव उत्तम कृष्णाजी पिंपळकर यांना फोन करून माहिती दिली.
दोघांनी मिळून मंदिरात प्रवेश करून पाहणी केली असता चांदीच्या पादुका व चांदीचा घोडा गायब असल्याचे त्यांना आढळले. या घटनेनंतर प्रवीण उराडे यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसानी अज्ञात आरोपींवर बीएनएस कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (इमेज एआय जनरेटेड)
चोरांना नाही देवांच भेवं !
चोरांना आता देवाचाही धाक उरलेला नाही. श्रद्धा, परंपरा आणि आस्थेचे प्रतीक असलेल्या मंदिरांनाही लुटण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. बोरी येथील गदाजी मंदिर हे संपूर्ण विदर्भात गोटमारीसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या आठवड्यात वरझळी येथील मंदिराची दानपेटी चोरट्याने फोडली होती. मंदिरात होणारी चोरी ही केवळ मालमत्तेची नव्हे, तर जनभावनांवर घाव घालणारी घटना ठरत आहे. वरझडी येथील चोरट्याच्या पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत मुसक्या आवळल्या होत्या.



Comments are closed.