वणीत नवोदित गायकांचा सूरांचा संग्राम: विदर्भ आयडॉल स्पर्धा उत्साहात

ज्यु. गटात प्रेम तेलंग तर सिनियर गटात भाग्यश्री खानोदे ठरले विदर्भ आयडॉल, जाणून घ्या संपूर्ण निकाल....

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या स्वरधारा ‘विदर्भ आयडॉल’ मेगा गायन स्पर्धेने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले. बाजोरिया लॉन येथे पार पडलेल्या या स्पर्धेला विदर्भभरातून गायक-गायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उत्कृष्ट गायन, रंगतदार सादरीकरण आणि नामवंत पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम वणीच्या सांस्कृतिक इतिहासात एक संस्मरणीय ठरला. ज्युनियर व सिनियर अशा दोन गटांमध्ये चुरशीच्या लढती रंगल्या. छ. संभाजी नगर येथील प्रेम तेलंग यांनी ज्युनियर गटातून प्रथम बक्षिस तर यवतमाळ येथील भाग्यश्री खानोदे यांनी सिनियर गटात प्रथम क्रमांक पटकावला. 

रविवारी सकाळी 9 वाजता विविध तालुक्यांतील प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात झाली. सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. सायंकाळी 5 वाजता मुख्य स्पर्धेला प्रारंभ झाला. सायंकाळी 7 वाजता इंडियन आयडॉल (2024) फेम उत्कर्ष वानखेडे यांच्या सुमधुर गीतगायनाच्या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. बाजोरिया लॉनवर मोठ्या संख्येने संगीतप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान संगीतकार रविंद्र वानखेडे, राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार विजेते संगीतकार दिलीप रोकडे, तसेच सुप्रसिद्ध तबला वादक व शिक्षक जयंत कुचनकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चेतन जोशी यांच्या गुरुकुल डान्स अकॅडमी तर्फे करण्यात आलेल्या सामूहिक व एकल नृत्याच्या सादरीकरणाने वणीकरांना मंत्रमुग्ध केले.

ज्युनियर गटाचे विजेते
ज्युनियर गटात प्रेम तेलंग (छत्रपती संभाजीनगर) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सावी तेलंग (नागपूर) यांनी द्वितीय, तर श्रीमई चिंचोळकर (अकोट) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय मनिष वरघट (यवतमाळ), रिधिमा शेजळ (वणी), गिरीष ठोसर (नागपूर), राधा कुचनकर (वणी), तन्मय तेंडुलकर (वणी), ओजस्वी श्रीवास्तव (घुग्घुस) आणि युग सोळंखे (अकोला) यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सिनियर गटाचे विजेते
सिनियर गटात भाग्यश्री खानोदे (यवतमाळ) यांनी प्रथम बक्षीस पटकावले. तनिष गजभिये (नागपूर) यांनी द्वितीय, तर पूजा शेंदरे (यवतमाळ) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. प्रोत्साहनपर बक्षिसांसाठी तेजस्विनी खोडतकर (नागपूर), अजय अतकरे (वर्धा), शर्वरी बाविस्कर (वणी), प्रणव कर्णेवार (आर्णी), धृप निखाडे (वणी), लाजरी भुरे (नागपूर) आणि प्रतीक्षा सोमकुंवर (चंद्रपूर) यांची निवड करण्यात आली.

श्री साई म्युझिकल ग्रुप, श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र, मैत्रेय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्व. पं. रामगोपालजी जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आयोजन संतोष जोशी, दिगांबर ठाकरे, जयप्रकाश सूर्यवंशी यांनी केले होते. अजित खंदारे, अरुण डवरे यांनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली, तर सविता डोर्लीकर, विणा मोहितकर, सुचिता गहुकर यांनी सहआयोजन केले. परीक्षक, आयोजक आणि उपस्थित प्रेक्षकांनी स्पर्धकांच्या गुणवत्तेचे कौतुक केले. 

Comments are closed.