हयात प्रमाणपत्रासाठी वृद्ध निराधार व्यक्तींची पायपिट

शेकडो निराधार वृद्धांचा एल्गार, वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन सादर

0

जब्बार चीनी, वणी: कोविड काळात परिस्थिती गंभीर असताना निराधार व्यक्तींना तहसिल प्रशासनातर्फे हयात प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली आहे. परिणामी शेकडो वृद्ध निराधारांना तहसिल कार्यलय व सेतू केंद्रात पायपिट करावी लागत आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज गुरुवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेकडो निराधार व्यक्ती व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की आधीच लॉकडाऊनमुळे सर्व जनता आर्थिक अडचणीत असून निराधार व्यक्तींवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच तहसिल प्रशासनाने गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून निराधार व्यक्तींचा भत्ता (निवृत्ती वेतन) थकवला आहे. नुकतेच लॉक डाऊन थोडे थोडे शिथिल होत असले तरी वणी शहरात व ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा मोठा फटका 60 वर्षांवरील वृद्धांना होत आहे.

सरकारने कोरोनामुळे वयोवृद्धाच्या प्रवासावर विविध अटी आणि शर्ती लावल्या आहेत. शिवाय वयोवृद्ध व्यक्तींना जिवाचा धोका असल्याने त्यांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. अशातच प्रशासनाने निराधार व्यक्तींचा भत्ता बंद केल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.

निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व जेष्ठ नागरीकांना त्यांचे निराधार निवृत्ती वेतन पूर्ववत करण्यासाठी हयात असल्याचे प्रमाणपत्रासह तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला सादर करण्याचा आदेश येथील तहसील प्रशासन यांनी दिल्याचा आरोप निराधार वयोवृद्धांनी केला आहे. परिणामी निराधार योजनेचे लाभार्थी गरीब व जेष्ठ नागरिकांची तहसील कार्यालय व सेतू केंद्रावर गर्दी वाढली आहे.

तहसिल प्रशासनाने हयात प्रमाणपत्रासाठी सक्ती केल्याने वयोवृद्ध निराधार व्यक्तींची पायपिट सुरू असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना कागदपत्रासाठी घराबाहेर पडण्यास भाग पाडून त्यांना पटवारी कार्यालय, सेतू केंद्रावर पाठवून प्रशासन त्यांच्या जिवाशी खेळत आहे. असा आरोप निवेदनातून कऱण्यात आला आहे.

 

सर्व निराधार वयोवृद्धांना विनाअट तात्काळ त्याचे वेतन जमा करावे व कोविड चा प्रादुर्भाव संपल्यावर त्यांच्या हयात प्रमाणपत्र व उत्पनाचा दाखला मागवावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदन देते वेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाउपाध्यक्ष मिलिंद पाटील, मंगल तेलंग, श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर, किशोर मुन, कपिल मेश्राम, राकेश तावडे, चंदन पळवेकर, रवी कांबळे, प्रशिल तामगाडगे, बाळू निखाडे, पुंडलीक मोहितकर, निखिल झाडे, यांचे सह शेकडो वयोवृद्ध निराधार व्यक्ती उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.