पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पोलीस उपविभाग वणी यांच्यातर्फे “अंमलीपदार्थाचे दुष्परीणाम” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत वणी, मारेगाव, मुकुटबन, शिरपूर आणि पाटण या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांतील तब्बल 1,634 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या यशस्वी समारोपानंतर आज बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला, यात विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
स्पर्धेत प्रथम क्रमांक तेजस्वी पराग बरडकर (वर्ग 9, सवुर्णलिला स्कूल, वणी), द्वितीय क्रमांक मानसी गणेश थेरे (वर्ग 10, राष्ट्रीय विद्यालय, मारेगाव) आणि तृतीय क्रमांकावर दोन विद्यार्थी तेजस्विनी प्रमोद बोडे (वर्ग 12, लोकमान्य टिळक महाविद्यालय) आणि सुचिता सुर्यभान परचाके (श्री. गुरदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरपूर) यांनी बाजी मारली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली. या स्पर्धेत पोलीस स्टेशन वणी हद्दीतील 1,120, मारेगावचे 200, मुकुटबनचे 100, शिरपुरचे 134 आणि पाटणचे 80 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
स्पर्धेमुळे समाजात सकारात्मक बदल – एसडीपीओ सुरेश दळवे
या स्पर्धेमुळे अंमलीपदार्थांच्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, त्यांच्या प्रतिभेचा गौरव करण्याची संधी मिळाली. विजेत्या विद्यार्थ्यांनी आपल्या लेखन कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधले. हा कार्यक्रम समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मोलाचा ठरला. भविष्यातही असे सकारात्मक व जनजागृती करणारे उपक्रम पोलीस विभागाद्वारे राबवले जाणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांचे मार्गदर्शन लाभले. सोहळ्याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, ठाणेदार गोपाल उंबरकर (वणी), ठाणेदार माधव शिंदे (शिरपुर) उपस्थित होते. तसेच, उपविभागातील सर्व ठाणेदार आणि पोलीस कर्मचारी प्रदिप ठाकरे, विजय वानखडे, इक्बाल शेख, रुपाली डाहुले, अमोल नुन्नलेवार यांनी परिश्रमपूर्वक स्पर्धेचे आयोजन केले.



Comments are closed.