रुग्णालयं झालीत “हाऊसफुल”
झरीजामणी तालुक्यात मलेरिया, डेंगीसह टायफाईडसदृश रुग्णसंख्येत वाढ
संजय लेडांगे, मुकुटबन: मागील बऱ्याच दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे व वातावरणातील बद्दलामुळे सर्दी ,ताप व खोकला या आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात मलेरिया, डेंगी आणि टायफाईडसदृश्य रुग्णही दिसून येत आहेत. सतत रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने शासकीय रुग्णालयात दररोज शंभराहून अधिक रुग्णांची नोंद केली जात आहे. यात तालुक्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी वाढत रुग्णालये ‘हाऊसफुल’ झाली आहेत.
तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे गावे चिखलमय झाली आहेत. तर ठिकठिकाणी पाणी साचून गावात डासांची उत्पत्ती होऊन आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, ताप, खोकला, हातपाय दुखणे या आजारांसह मलेरिया, डेंगी आणि टायफाईडसदृश्य रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. झरीजामणी आणि मुकुटबन येथील शासकीय रुग्णालयांमध्ये दररोज 100 ते 150 रुग्णांची नोंद होत आहेत.
तालुक्यात झरी येथील ग्रामीण रुग्णालयासह शिबला आणि मुकुटबन या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत जवळपास 20 उपकेंद्राद्वारे तालुक्यातील साधारणतः 106 गावांतील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविली जाते आहेत. सध्या वातावरणातील बद्दलाने व सतत पडणाऱ्या पावसामुळे गावा-गावांत रूग्णांची संख्या वाढत आहेत. तर उपचारांसाठी रुग्ण शासकीय व खाजगी रुग्णालयाचा आधार घेत आहेत. या रुग्णांमध्ये मलेरिया ,डेंगी आणि टायफाईड सदृश्य रुग्णही आढळून येत आहेत.