मुल होत नसल्यानं करण्यात आलं बाळाचं अपहरण

बाळ विकत घेणा-या दाम्पत्यासह 5 जणांना अटक

0

रवि ढुमणे, वणी: वणीच्या ग्रामीण रुग्णालतातून दोन दिवसाचे बाळ चोरून नेल्याची घटनेनं एकच खळबळ उडवून दिली होती. केवळ पाच तासांच्या आत या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. तेलंगणातील एका दाम्पत्याला मुल होत नसल्याने त्यांना एका बाळाची गरज होती. त्यासाठी ग्रामीण रुग्णालयातून बाळाचं अपहरण करण्यात आल्याचं समोर आलं आहे.  वणी पोलिसांनी तेलंगणातील आसिफाबाद येथून आरोपी दाम्पत्याला अटक केली आहे. तसंच वणीतून 3 आरोपी अशा एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. सध्या बाळ सुखरूप असून बाळाला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.  पोलिसांनी गुंतागुंतीचं वाटणारं हे प्रकरण अवघ्या काही तासात सोडवल्यानं वणी पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, वणी शहरातील रजा नगर भागातील नुसरतचा हिंगणघाट येथे अब्दुल सत्तार यांच्याशी निकाह झाला होता. प्रसूतीसाठी ती आपल्या आईवडिलांकडे आली होती. दरम्यान 6 नोव्हेंबर ला तिला प्रसूतीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी नुसरतने गोंडस बाळाला जन्म दिला. मंगळवारी रात्री दीड वाजे पर्यंत ते बाळ तिच्या सोबत होतं. साडेचार वाजता नुसरत झोपेतून उठली. तेव्हा तिला तिच्या बाजुला बाळ दिसले नाही. तिने आजुबाजुला विचारपूस केली असता तिथं बाळ चोरीला गेल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यामुळे रुग्णालयात एकच कल्लोळ झाला. नुसरते नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले.

सकाळी 6 वाजता  नुसरतच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरविली. सर्व पोलीस यंत्रणा तपासाला लागली. यात पूर्वी डीबी पथकामध्ये कार्यरत असलेले उल्हास कुरकुटे यांनी सूत्रे हलवीत चोरट्यांचा सुराग लावला.

रुग्णालयात सफाई कामगार असणारा गणेश वाघमारे व त्याचा साथीदार श्रीकांत चुनारकर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आधी तर त्यांनी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. मात्र त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले. सदर बाळ हे आसिफाबाद येथे 60 हजार रुपयात विकल्याची माहिती त्यांनी पोलिसांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी सुत्रे हलवत या प्रकरणाचा छडा लावला.

वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश केशव कुभारकर राहणार वणी याचा साळा राजू रामलू बडावत हा तेलंगाणातील मन्चेरिअल इथं राहतो. त्याला मुल नसल्याने एखादं मुल खरेदी करण्याची इच्छा रमेश कुंभारकरकडे व्यक्त केली. आरोपी गणेश आणि श्रीकांत यांनी रमेशला मुल आणून देतो असं सांगितलं. त्यानुसार त्यांनी पहाटे तीनच्या सुमारास सर्व झोपून असल्याचा फायदा घेत ग्रामीण रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी केली आणि ते बाळ रमेश कुंभारकर याच्या ताब्यात दिले. रमेशने सदर बाळ राजू बडावत व त्याची पत्नी शारदा बडावत यांच्या ताब्यात दिले. सकाळी पाचच्या सुमारास हे दाम्पत्य वणी डेपोतून महामंडळाच्या मन्चेरिअल गाडीतून तेलंगाणात रवाना झाले.

त्यानंतर वणी पोलिसांची टीम लगेच तेलंगाणाच्या दिशेने रवाना झाली. त्यांनी दाम्पत्यांच्या मोबाईल लोकेशन काढले असता ते आदिलाबाद इथंपर्यंत पोहोचले असल्याचे पोलिसांना कळाले. त्यानुसार त्यांनी लगेच आसिफाबाद पोलीस स्टेशनला संपर्क साधला. त्यानंतर नाकाबंदी करण्यात आली. अखेर ते दाम्पत्य आसिफाबाद येथे बस स्टॉपच्या बाजूला एका लिंबाच्या झाडाखाली आश्रय घेऊन असलेले दिसले. वणी पोलिसांनी लगेच त्यांना विचारपूस करून  ताब्यात घेतले. मुल होत नसल्याने त्यांनी 60 हजार रुपयात बाळाचा सौदा केला असल्याची माहिती वणी पोलिसांना दिली. तसंच या सौद्यातील 30 हजार रुपये त्यांनी ऍडवांस म्हणून दिला होता.

 (हे पण वाचा: जाणून घ्या किती वाजता काय झाले, कसे हलले सूत्र)

या प्रकरणी दाम्पत्यासह एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर अपहरण आणि बाळ विक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक एम राजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार बाळासाहेब खाडे, हेड कॉन्स्टेबल अरुण नाकतोडे, सुदर्शन वानोळे, आनंद आलचेवार व डीबी पथकाचे नाईक पोलीस कॉन्स्टेबल नफीस शेख, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, उल्हास कुरकुटे, दीपक वाड्रसवार, इम्रान खान इत्यादींनी पार पाडली, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अशोक काकडे आणि नाईक पोलीस कॉन्स्टेबल उल्हास कुरकुटे करीत आहे.

काय म्हणाले वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.