रानडुकरांकडून खरिपातील पिकांची प्रचंड नासधूस

शेतकऱ्याची वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी

तालुका प्रतिनिधी, वणी: रानडुकरांचे कळप शेतातील पिकांत शिरून सोयाबीन, कपाशी आदी खरिपातील पिकांचे प्रचंड नुकसान करीत आहेत. मेंढोली येथील एका शेतकऱ्याच्या कपाशी पिकाची प्रचंड प्रमाणात नासधूस करण्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यानी वनविभागाकडे केली आहे.

वणी तालुक्यातील खरिपातील पिकांची स्थिती समाधानकारक आहेत. शेतकरी पिकांवर फवारणी, निंदन, खुरपन, डवरणी करण्याच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, वन्यप्राणी पिकांत धुडगूस घालून पीक नष्ट करीत आहेत. यात शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. जंगलातील अतिक्रमणामुळे वन्यप्राण्यांची निवासस्थाने नष्ट झाली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर शिवारात वाढला आहे. परिणामी रात्रंदिवस वन्यप्राण्यांचा वावर शेतशिवारात दिसून येतो.

एवढंच नव्हे तर वन्यप्राणी शेतातील पिकांत निवारे तयार करून दडून बसतात. वन्यप्राण्यांना हुसकावून लावताना वन्यप्राणी शेतकऱ्यांवर हल्ला चढवतात. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेंढोली येथील बाबाराव कावडे यांच्या शेतातील कपाशी पिकांचे रानडुकरांनी प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहेत. यात सदर शेतकऱ्यांचे तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत आर्थिक नुकसान झाले आहे.

नुकसानीची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. वन्यप्राण्यांना पिकांतून हुसकावून लावताना वन्यप्राणी आक्रमक पवित्रा घेऊन हल्ला चढवतात. परिणामी शिवारात कामे करताना शेतकरी, शेतमजूरांना भीतीयुक्त वातावरणात वावरावे लागते. शिवारातील वन्यप्राण्यांमूळे पिकें नष्ट होण्यासह शेतकऱ्यांच्या जीवाला धोका संभवतो. वनविभागाचे रोही, रानडुकरांप्रति असलेले प्रेम शेतक-यांना मारक ठरत आहे.

हे देखील वाचा: 

एक दुजे के लिए ! विवाहित प्रेमीयुगुलाची एकत्र आत्महत्या

 

Comments are closed.