सोमवारपासून राकाँचे वणीत आमरण उपोषण

यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणी

0

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त असताना केवळ काही तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्तांच्या यादीत करणे हा अऩ्याय आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आमरण उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. संपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा ही मागणी घेऊन सोमवारी दिनांक 29 ऑक्टोबरला सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा हे शेकडो शेतकरी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांसह तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे.

यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्तांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे इथला शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलतो. यावर्षीही दुष्काळामुळे शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. दुष्काळामुळे शेतमालाच्या उत्पादनावर 50 टक्क्यांपेक्षा अधिकचा परिणाम झाला आहे. मात्र सरकारने फक्त यवतमाळ जिल्ह्यातील फक्त 9 तालुक्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असल्याचं घोषीत केले आहे.

यवतमाळ जिल्ह्याची ओळख ही दुर्दैवाने शेतकरी आत्महत्येचा जिल्हा म्हणून आहे. मुख्यमंत्री हे विदर्भातील असून ही त्यांना ही ओळख पुसता आली नाही. ही ओळख पुसण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याला विशेष पॅकेज, सवलतीची गरज आहे. मात्र याउलट संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करण्याऐवजी सरकार जिल्ह्यातील केवळ 9 तालुक्यांत दुष्काळसदृष्य परिस्थिती असल्याचे जाहीर करत आहेत. त्यामुळे हा यवतमाळ जिल्ह्यावर अन्याय आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

शेतकरी आधीच सततच्या दुष्काळाने आणि नापिकीने हवालदिल झाला आहे. त्यातच सरकारने संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत न केल्याने शेतक-यांचे यावर्षीही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. संपूर्ण यवतमाळ जिल्हा हा जोपर्यंत दुष्काळग्रस्त जाहीर होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपोषण सुरू राहणार आहे.

वणी बहुगुणीशी बोलताना डॉ. लोढा म्हणाले की…

संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळ आहे. मात्र प्रशासनाने चुकीच्या निकषावर दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर केली आहे. सरकारच्या या चुकीच्या धोरणांमुळे शेतक-यांच्या आत्महत्येच्या संख्येत वाढ होईल. यवतमाळ जिल्हा हा विदर्भात येत असून मुख्यमंत्रीही विदर्भाचे आहे. त्यांनी यवतमाळ जिल्ह्याची आत्महत्याग्रस्त शेतक-यांचा जिल्हा ही ओळख पुसणे गरजेचे आहे. मात्र त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे जोपर्यंत सरकारला जाग येत नाही तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहणार. असा इशाराही डॉ. लोढा यांनी दिला.

सदर आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. ख्वाजा बेग यांच्या मार्गदर्शनात होत असून, या आंदोलनात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्यासह राकाँचे वणी विधानसभा अध्यक्ष जयसिंगजी गोहोकर, राजाभाऊ बिलोरिया, प्रभाकर मानकर, संजय जंबे, महेश पिदूरकर, संदिप धवणे, अंकुश नेहारे, विजया आगबत्तलवार, संगीता खटोड, सूर्यकांत खाडे, अंकुश मापूर, स्वप्निल धुर्वे, सिराज सिद्दीकी, भारत मत्ते, मारोती मोहाडे, राऊत, नितीन गोडे, राजू उपरकर, अशोक उपरे, रवि येमुर्ले, प्रतिभा तातेड यांच्यासह वणी मारेगाव आणि झरी तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.