वणी बसस्थानकावर साकारला आदर्श भाजीबाजार

संसर्ग व गर्दी टाळण्यासाठी विविध उपाययोजना

0

जब्बार चीनी, वणी: संचारबंदीच्या काळातही भाजीबाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरीही भाजीबाजारात मात्र सोशल डिस्टंसिन्गचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. याला आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्या संकल्पनेतून स्थानिक बसस्थानकावर आदर्श भाजीबाजार साकारण्यात आला आहे. हा  भाजीबाजार बुधवारपासून  ग्राहकांकरिता सुरू झाला आहे.

शहरातील मुख्य भाजीबाजारात मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टंसिन्ग करिता ठोक भाजीबाजार कृषि उत्पन्न बाजार समितीत हलविण्यात आला होता. तर चिल्लर भाजीबाजाराची दुकाने काही प्रमुख चौकात वेगवेगळी लावण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र गांधी चौक, जटाशंकर चौक, आंबेडकर चौक व टिळक चौकात सोशल डिस्टंसिन्ग पाळल्या जात नव्हते. त्यामुळे प्रशासन वैतागले होते.

यावर उपाय म्हणून शेवटी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, पोलीस निरीक्षक वैभव जाधव, तहसिलदार शाम धनमने व नगर पालिका मुख्याधिकारी संदीप बोरकर सांनी सविस्तर चर्चा करून स्थानिक बसस्थानकावर भाजीबाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला. नगर पालिकेला यासंबंधी कार्रवाही करण्याचे निर्देश देण्यात आले व नगर पालिकेने दोन दिवसात हा भाजीबाजार सुरू केला.

कसा आहे हा आदर्श भाजीबाजार?

या ठिकाणी तब्बल 65 दुकानाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक दुकानांमध्ये तीन फुटायचे अंतर ठेवण्यात आले आहे.  येथे सोशल डिस्टन्सिंगचे काटेकारपणे पालन व्हावे म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेर रकाने तयार करुन ग्राहकांना तेथे उभे ठेवण्यात आले आहे. दुकानदारांसाठी सकाळी 6 ते दुपारी 12 वाजताचा वेळ देण्यात आला आहे. शहरातील भाजीपाल्याची सर्व दुकाने या ठिकाणी हलविण्यात येणार आहे.  बसस्थानकाचे तिन्ही प्रवेशव्दार बंद करण्यात आले असून फक्त एका वेळेला दोन नागरिकांना येजा करण्यासाठी मार्ग मोकळा ठेवला आहे. गेट जवळ हॅण्डवॉश व सॅनिटायझरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच दुकानदारांना सुरक्षा किट देण्यात आली आहे.  या ठिकाणी पोलीस , प्रशासनाचे कर्मचारी  पूर्णवेळ उपस्थित राहतील.

भाजी विक्रेत्यांची नाराजी

प्रशासनाने शेतक-यांना  भाजी विक्रीची परवानगी दिली आहे. भाजीबाजार बसस्थानकात हलवल्यानंतरही सकाळी 9 वाजेपर्यंत बाहेरगावाहून आलेले भाजी विक्रेते टिळक चौकात भाजी विक्री करतात. ग्राहक आधी टिळक चौकात जातो त्यानंतर बसस्थानकाकडे येतो, त्यामुळे टिळक चौकातील भाजी विक्री बंद करावी व त्यांना ही बसस्थानकात भाजी विक्री करू द्यावी अशी मागणी बस स्थानकातील भाजी विक्रेत्यांनी केली आहे. तर विषयावर उपविभागीय अधिकारी यांनी उद्यापासून टिळक चौकात भाजीचे दुकान लागणार नाही अशी माहिती ‘वणी बहुगुणी’ला दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.