निसर्गरम्य देऊळवाडा येथील संगमेश्वर देवस्थान दुर्लक्षित
कार्तिक पौर्णिमेला भरते यात्रा, तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी
तालुका प्रतिनिधी, वणी: यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर आणि पैनगंगेच्या तीरावर वसलेलं छोटस देऊळवाडा गावं. गावाच्या पैलतीरावर कोरपना तालुक्यातील कोळसी गाव. देऊळवाडा येथील पैनगंगा – विदर्भा नदीच्या संगम स्थानावरील संगमेश्वर देवस्थान आहे. मात्र, प्राचीन काळापासून असलेल्या मंदिराच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे देवस्थान परिसराचा विकास करण्याची मागणी भाविक व ग्रामस्थांकडून होत आहे.
वणी तालुक्यातील देऊळवाडा येथील सदर मंदिर अतिशय पुरातन असून या स्थानी शिवलिंग, भगवान गणेश, हनुमान आदी देवतेच्या मूर्त्या अनादी काळापासून स्थापित आहे. 1990 च्या दशकात येथे भव्य मंदिराची उभारणी करून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला मोठा उत्सव सुद्धा असतो. परंतु मंदिर व परिसराच्या विकासाच्या दृष्टीने या स्थानाला अद्यापही तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला नाही. त्यामुळे येथील विकास खुंटला गेला आहे.
येथे जाण्या येण्याचा मार्गही अतिशय खडतर आहे. देऊरवाडा ते तेजापूर मार्गावर पुलाची व पक्क्या रस्त्याची निर्मिती झाल्यास हे स्थान सोयीचे होईल. येथील संगम स्थानावर संगमेश्वर नावाचा धबधबा सुद्धा आहे. पावसाळ्यात हा ओसंडून वाहतो. त्यामुळे येथील नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी वणी तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, जिवती तालुक्यातून येथे नागरिक येतात.
परंतु अपेक्षित सोयीसुविधांच्या अभावामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो आहे. त्यामुळे या भागाचा विकास करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पुरातत्व खात्याने सदर मंदिर परिसरात संशोधन केल्यास अनेक गुढ गोष्टींचा उलगडा होऊ शकतो.
हे देखील वाचा: