अवैध दारू विक्रीला उधाण, पोलिसांची रेड

दामले फैल येथील कारवाईत 32 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील दामले फैल परिसरात पोलिसांनी छापा टाकून तब्बल 32 हजार रुपयांचा अवैध देशी दारुचा साठा जप्त केला. या कारवाईदरम्यान, अवैध दारूचा साठा बाळगणारा आरोपी शिवराज सुरेश रायपुरे (रा. दामले फैल) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही प्रभावी कारवाई पार पाडली.

प्राप्त माहितीनुसार, ड्राय डेच्या दिवशी अवैध दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात उधाण येते. याच दरम्यान दामले फैल परिसरातील एका पानठेल्याजवळ अवैध दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने ठिकाणी धाव घेऊन छापा टाकला. कारवाईदरम्यान, खाकी रंगाचे सहा खोके आणि निळ्या चुंबळीत भरलेल्या 90 मिली क्षमतेच्या 200 शिशा असा एकूण 800 बॉटल्स देशी दारू हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी शिवराज रायपुरे याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी त्याला मुद्देमालासह वणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, पोलिस निरीक्षक सतीश चवरे, सपोनि दत्ता पेंडकर, धनराज हाके, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी आणि सतीश फुके यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा ठोस प्रयत्न दिसून येत आहे, ज्याचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत होत आहे.

Comments are closed.