पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी-मुकुटबन मार्गावरील साईलीलानगरी परिसरातील एका विवाहित युवतीने 19 जुलै रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती. तिने पतीच्या छळाला व हुंड्याच्या सततच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केली, असा आरोप मृत विवाहितेच्या वडिलांनी केला होता. त्यांच्या तक्रारीवरून तिच्या पतीसह सासू व नणंदविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आत्महत्येच्या घटनेला दीड महिन्याहून अधिक कालावधी लोटूनही आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या पतीला वणी पोलिसांनी अटक केलेली नाही. असा आरोप मुलीच्या माहेरकडील कुटुंबीयांनी रविवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
मृत आरती जयबुद्ध बुरचुंडे हिचे वडील व कुटुंबीयांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती. परंतु, मुख्य आरोपी अद्यापही मोकाट आहे. त्यामुळे तिचे वडील किशोर भाऊराव करमरकर, आई रेखा करमरकर, भाऊ शुभम करमरकर, बहीण पूजा पुडके आणि जावई राहुल पुडके यांनी रविवारी याबाबत येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. तसेच सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन न्याय मागणार असल्याचे किशोर करमरकर यांनी यावेळी सांगितले.
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिचा पती जयबुद्ध संकल्प बुरचुंडे, सासू प्रतिमा बुरचुंडे व नणंद (सर्व रा. मातोश्रीनगर, वरोरा, जि. चंद्रपूर) यांच्याविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी सासू व नणंद यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला. मुख्य आरोपी पती जयबुद्ध बुरचुंडेने केलेली जामीन याचिका हायकोर्टाने फेटाळली. मात्र, त्यानंतरही वणी पोलिस आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने आरतीच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याबाबत आता प्रश्नचिन्ह आहे.
“सेटिंग” करणारा तो पोलीस अधिकारी कोण?
आरती बुरचुंडे या महिलेच्या आत्महत्येनंतर तिचे वडील तक्रार देण्यासाठी वणी पोलिस ठाण्यात पोहोचले होते. दरम्यान तिथे वरोरा येथील एक पोलीस अधिकारी आणि एक वकिलाने त्यांची भेट घेऊन परस्पर समझोता करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत केला. महिला अत्याचार आणि हुंडाबळीचे प्रकरण सेटिंगने निपटवणारा हा पोलीस अधिकारी कोण आहे याची सध्या चर्चा सुरु झाली आहे. जर मृत मुलीला न्याय मिळाला नाही, तर पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देखील विवाहितेच्या वडिलांनी दिला आहे.
(काय आहे हे संपूर्ण प्रकरण… वाचा खालील लिंकवर क्लिक करून)



Comments are closed.