विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनाने दारु विक्रीची दुकाने काही दिवस बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचा फायदा अवैध दारू विक्रेते घेतांना दिसून येत आहे. प्रशासनाने या अवैध विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जनसामान्यांकडून जोर धरत आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक ठिकाणी गर्दी होय नये म्हणून शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी बार व वाइन शॉप बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला. परंतु या निर्णयाचा फायदा अवैध दारू विक्रेते मोठया प्रमाणात घेत आहे. अगदी बारच्या समोरच आपली दुकाने थाटून हे विक्रेते दारूची अवैध विक्री करीत असल्याची माहिती आहे.
शौकिनांचा शौक पूर्ण करण्यासाठी हे अगदी पहाटेपासूनच आपल्या कामाला लागतात. वणी शहरात दीपक टॉकीज, ब्राह्मणी फाटा, लालपुलिया परिसर या ठिकाणी हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. अगदी पहाटेपासूनच या ठिकाणी मद्यपिंची गर्दी पहावयास मिळते.
अवैध दारू विक्रेत्यांना कुणाचे अभय?
हे व्यावसायीक काही सरकारी अधिकाऱ्यास हाताशी धरून मोठया ऐटीत हा व्यवसाय करीत आहे. पोलीस प्रशासनाचे वाहन अगदी समोरून गेले तरी न घाबरता ते आपला व्यवसाय करीत आहे. यांच्याकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याने या या व्यावसायिकांवर कारवाई का नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.