त्याने केलं शुटिंग अन् मागे लागलं धतिंग

अवैध दारूविक्रीचं शुटिंग करणाऱ्यास मारहाण

0

सुशील ओझा, झरी: दारूच्या अवैध विक्रीचं त्याने शुटिंग केलं. सोशल मीडियावरून ते व्हायरल झालं. सोबतच त्याच्यामागे धटिंग लागलं. त्याला त्या कारणासाठी मारहाण झाली. मुकुटबन येथील युवकास मार खावा लागला. पोलीस तक्रारीची वाट पाहत, मूग गिळून गप्प बसल्याचं बोललं जात आहे.

तालुक्यातील मुकुटबन येथील मच्छीमार सोसायटी चौकामध्ये खुलेआम अवैध दारूविक्री सुरू आहे. गावाच्या मध्यभागी हा दारूविक्रीचा अवैध धंदा सुरू आहे. दारूच्या धंद्यात तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दार विक्रेत्याजवळ काम करणारे तरुण त्याच वॉर्डातील आहेत. मच्छीमार सोसायटीत दारूची विक्री करतात.

८ ऑक्टोबर रोज ड्रायडे असल्यामुळे बियरबार व देशी दारूची दुकाने बंद होती. वॉर्डातील कचरा टाकण्याकरिता स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतने चौकात कचरापेटी ठेवली आहे. परंतु याच कचरा पेटीत दारू विक्रेत्यांची अवैध देशी दारूच्या बाटल्या ठेवून काही तरुण १०० रुपये बाटली याप्रमाणे विक्री करीत होते.

तेथीलच एका सुज्ञ तरुणाने ही विक्री आपल्या मोबाईलच्या सहाय्याने व्हिडीओ शूटिंग करून कैद केली. शूटिंग केल्याची माहिती अवैध दारूविक्रेत्यांना कळताच दारूविक्रेता हा आपल्या सोबत १० ते १५ माणसांना दारू पाजून व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या गोपाल नामक तरुणाला रात्री १० वाजता दरम्यान बेदम मारहाण केली. गोपाल याला धमकविण्यात आले.

मारहाणीत तरुणाला मार लागला. पायाच्या गुडघ्यालासुद्धा मार असल्याचे बोलले जात आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला झाल्याची ओरड गावात सुरू आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचासुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर दारूविक्रेत्याला पोलिसांचे सहकार्य असल्यामुळे त्यांची हिंमत वाढली असल्याची चर्चा आहे.

अशा प्रकारामुळे गावात एखादी मोठी घटना घडल्यास याला जवाबदार अवैध दारूविक्रेता की पोलीस असा संतप्त प्रश्न ग्रामवासी उपस्थित करीत आहे. पोलीसांच्या दुर्लक्षामुळे अवैध धंद्यात प्रचंड वाढ झाली आहे. अवैध दारूविक्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला व त्या तरुणाला बेदम मारहाण झाली.

याची माहिती गावासह संपूर्ण जिल्ह्यात वायरल होऊनही पोलिसांनी अजूनपर्यंत कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. मारहाण झालेल्या तरुणास काही झाल्यास याला जवाबदार कोण? असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे. गोपाल याला मारहाण केल्याने काही सामाजिक संघटना सरसावल्या आहे.

सदर मारहाणीचा विरोध करून संताप व्यक्त केला जात आहे. शूटिंग करणाऱ्या युवकाला ग्रामपंचायतीसमोर मारहाण केल्याने ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही मध्ये मारहाणीचे फुटेज असल्याची चर्चा संपूर्ण गावात आहे. मारहाणीमध्ये जखमी युवकावर दबाव असल्याने तक्रार देण्यास धजावत आहे.

काही सामाजिक संघटनानी मारहाणीचा निषेध करीत कार्यवाही करण्याकरिता पुढाकार घेणार असल्याची माहिती आहे. तरी सदर प्रकरणाकडे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालून मारहाण करणारे तरुण तसेच दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.