नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील केगाव (बोदाड) येथे बेंबळा पाटबंधारे विभागाने शेतक-यांच्या शेतातून पाटस-याच्या नालीचे खोदकाम केले आहे. सदर बांधकाम हे चुकीच्या पद्धतीने केले असल्यामुळे शेतक-यांचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. याबाबत शेतकरी पार्वताबाई ठमके यांनी अभियंत्यांनी विश्वासात न घेता व कुठलीही माहिती न देता खोदकाम केल्याचा आरोप करत याविरोधात तक्रार दिली आहे.
तालुक्यातील मार्डी विभागातील अनेक गावातील शेत शिवारात सिंचनाच्या सुविधेसाठी बेंबळा पाटबंधारे विभागाकडून कालवे, पाटसऱ्याचे काम सुरु आहे. केगाव येथे पार्वताबाई करनू ठमके यांचे गट क्र.115 मध्ये शेत आहे. त्यांच्या शेतातून पाटसरा काढण्यात आला आहे. मात्र सदर खोदकाम हे चुकीच्या पद्धतीने केले असून यामुळे पाटस-याचे पाणी थेट शेतात पोहोचू शकते व परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे असा आरोप पार्वताबाईंनी केला आहे.
बेंबळा प्रकल्पाचे अभियंता कांबळे व कर्मचारी डवरे यांनी आपल्या मर्जीने गेल्या एप्रिल महिन्यात थेट शेतातून पाटसऱ्याच्या नालीचे चुकीचे खोदकाम केले. शिवाय हे काम करताना शेतमालक किंवा त्यांच्या वारसांना विश्वास न घेता हे काम करण्यात आले आहे. असाही आरोप पार्वताबाईंनी केला आहे. थेट शेतातून नालीचे चुकीच्या पद्धतीने खोदकाम केल्याने शेताचे नुकसान होत असल्याची ओरड मार्डी परिसरातील अनेक शेतकरी बांधव करीत आहे.
या प्रकरणी संबंधित अभियंत्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले. त्यामुळे अखेर अभियंता कांबळे व डवरे यांच्या विरोधात तहसीलदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आली आहे. खोदण्यात आलेले चुकीचे नालीचे काम येत्या दोन दिवसात पूर्ण न केल्यास, शेतामध्ये उपोषण करण्याचा इशारा तक्राराहही कर्त्यांनी दिला आहे.
हे देखील वाचा:
चारगाव चौकीवर सिनेस्टाईल पाठलाग करून दारू तस्कराच्या आवळल्या मुसक्या