पंचशील नगर प्रकरणी आमदारांनी घेतली पीडित बहिणींची भेट
प्रकरणाचा पाठपुरावा करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन
विवेक तोटेवार, वणी: शास्त्रीनगर येथील 3 बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात पंचशील नगर येथील दोन बहिणींनी छळ झाल्याचा आरोप केला होता. या प्रकणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी करीत पीडित भगिणींनी यवतमाळ येथे जाऊन पोलीस अधिक्षकांची भेट घेत याबाबत निवेदन दिले होते. बुधवारी या प्रकरणाची वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दखल घेत या दोन्ही बहिणींची घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यास जी काही मदत लागेल ती करण्याचे आश्वासन दिले.
बेपत्ता मुलीचे व पीडित बहिणीचे प्रकरण पोलीस अधिक्षकांकडे जातात या प्रकऱणात वणी पोलिसांनी आरोपी एहतेशाम याच्यावर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान बुधवारी पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वणीतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांतर्फे एसडीपीओ व आमदार यांना निवेदन देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. आमदारांकडे हे प्रकरण जाताच त्यांनी तातडीने पीडित बहिणींना भेट घेण्याचा निर्णय़ घेत बुधवारी संध्याकाळी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पंचशील नगर गाठले व पीडित बहिणींची भेट घेत त्यांची विचारपूस केली.
आरोपी एहतेशामने या तीन अल्पवयीन मुलींना पुण्याला नोकरीला लावून देतो असे सांगून पुण्याला घेऊन जाणार होता. मात्र मुलींना फूस लावून पळवल्यानंतर त्याने लॉकडाऊनचे कारण सांगून त्या तीन मुलींना पंचशील नगर येथील रहिवाशी असलेल्या 2 तरुणीच्या घरी खोटे बोलून ठेवले होते. तिथे पोलिसांनी पंचशील नगरच्या तरुणींना सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप करत अपमानास्पद वागणूक देत रात्री 9 वाजताच्या दरम्यान पोलीस ठाण्यात नेले. तिथे त्यांना शिविगाळ करून मारहाण केली. तसेच रात्री 12.30 वाजताच्या दरम्यान सोडून न देता घरी पाठवले असा आरोप पंचशील नगर येथील दोन पीडित बहिणींनी केला होता.
या प्रकरणी आमदारांनी भेट देत मदतीचे आश्वासन दिल्याबद्दल पीडित बहिणींनी समाधान व्यक्त केले आहे. या प्रकरणी सर्वपक्षीय व संघटनेचे लोक मदतीला पुढे येत असल्याबाबतही त्यांनी आभार मानले. दरम्यान बुधवारी आमदार आणि एसडीपीओ यांना निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडितांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. निवेदनावर अनिल तेलंग, अनिल घाटे, प्रवीण खानझोडे, कर्मा तेलंग, कृपाशील तेलंग, ऍड रुपेश ठाकरे, संदीप गोहोकर, पुखराज खैरे, साहब शेख यांच्या सही आहेत.