अखेर मारेगाव येथून पलायन केलेला पॉझिटिव्ह रुग्ण सापडला

पलायनाचे कारण ऐकूण सर्वच थक्क...

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील चिंधुजी पुरके आश्रम शाळेतील कोविड केअर सेंटर मधून बुधवारी 29 जुलै रोजी कुंभा येथील कोरोनाच्या रुग्णाने पळ काढला होता. रुग्ण पळून जाताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. काल पासून पोलिसांची टीम त्या रुग्णाचा शोध घेत होते. अखेर आज सकाळी 7 वाजताच्या दरम्यान तालुक्यातील धामणी येथील एका शेतात तो आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्या रुग्णावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णाचे पळून जाण्याचे कारण ऐकून सर्वच हेलावून गेले.

कुंभा येथील एक चाळीस वर्षीय पुरुषाला कोरोना पॉजिटिव्ह आल्याने मारेगाव येथील कोविड केअर सेन्टरमध्ये अलगिकरण (आयसोलेशन) कक्षात ठेवण्यात आले होते. हा पुरुष राजुर (कॉलरी) येथील रुग्णाच्या संपर्कात आल्याने पॉजिटिव्ह आला होता. बुधवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास तो लघवीसाठी उठला होता. तेव्हा त्याला कोविड सेन्टरमध्ये शुकशुकाट दिसला. याचा फायदा घेऊन त्याने तिथून पळ काढण्याचा निर्णय घेतला व गार्डची नजर चुकवून त्याने सेन्टरच्या मागच्या बाजूने पलायन केले.

पहाटेच्या अंधारात कुंभा जाण्याचा रस्ता न गवसल्याने तो पहाटेच्या सुमारास शेतात भटकत होता. दरम्यान दिवस उजाडताच त्याला काही शेतकरी व पोलीस शोध घेत असताना दिसले. तो दिवसभर घाबरून परिसरातील शेतातच लपून राहिला. दुसरीकडे रुग्ण पळून गेल्याने प्रशासकीय विभागात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी रुग्णाचा शोध घेत संपूर्ण परिसर पिंजून काढला. पारवा, कोटेश्वर, कुंभा परिसरात शोध घेत त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे जाऊन चौकशी केली. दरम्यान धामणी येथील एका शेतकऱ्याला संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास तो मदनापूर मार्गाने परत येत असताना दिसला. त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा या परिसरात शोध घेतला मात्र त्यांच्या हाती निराशा आली.

तो रुग्ण धामणी शिवारात दिवसभर फिरत होता. एका शेतातील गोठ्यात त्याने रात्र काढली. सकाळच्या सुमारास एका शेतक-याला तो रुग्ण धामणी शिवारात एका गोठ्याजवळ बसून असलेला आढळला. रुग्ण आढळताच त्याने गावातील पोलीस पाटील यांना याबाबत माहिती दिली. पोलीस पाटलांनी तात्काळ पोलिसांना संपर्क साधला. सकाळी 7 वाजताच्या दरम्यान पोलीस प्रशासनाने त्या रुग्णाला ताब्यात घेतले. रुग्ण सापडताच प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला.

पलायन करण्याचे कारण ऐकूण सर्वच थक्क
पोलिसांनी चौकशी केली असता त्याने संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली. जेव्हा त्यांनी पळ काढण्याचे कारण विचारले तेव्हा पोलीसही हेलावून गेले. रुग्ण पॉजिटिव्ह निघाल्याने रुग्णाच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती कॉरन्टाईन आहेत. घरी कुणीही व्यक्ती नाही. त्यामुळे त्याला त्याच्या घरच्या जनावरांची काळजी वाटत होती. ते कसे आहेत? त्याची कोण काळजी घेत आहे? ते उपाशी तर नाही? याची त्याला सारखी चिंता सतवायची. दरम्यान तो पॉजिटिव्ह असल्याने लोकही त्याच्याशी संवाद साधण्यास टाळाटाळ करायचे. अखेर गुराढोरांच्या काळजीपोटी त्या रुग्णाने तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला व संधी मिळताच कोविड केअर सेन्टरमधून पळ काढला.

सदर रुग्ण शेतशिवारातच संपूर्ण दिवस उपाशीपोटी फिरत होता. भीतीपोटी त्याने कुणालाही संपर्कही साधला नाही. तसेच तो कुणाच्याही संपर्कात आला नसल्याची माहिती त्याने प्रशासनाला दिली. मात्र खबरदारी म्हणून प्रशासन कुणाच्या संपर्कात तर आला नाही याचा तपास करीत आहे. रुग्णावर कोविड आपत्ती कायद्याच्या कलम 269, 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पो.नि. जगदीश मंडलवार, पो.उप.नि. अमोल चौधरी, इकबाल शेख, किशोर आडे, चलाख मेजर, राजू टेकाम आदींनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.