लष्करी इतमामात ले. कर्नल वासुदेव आवारी यांच्यावर अंत्यसंस्कार

वीरगती प्राप्त झाल्याचा अभिमान - वीरपिता दामोदर आवारी... मुर्धोनीत उसळला जनसागर... जयघोषांनी ले. कर्नल यांना अखेरचा निरोप

जितेंद्र कोठारी, वणी: अरुणाचल प्रदेश येथे भारत-चीन सीमेवर कर्तव्यावर असताना निधन झालेले ले. कर्नल वासुदेव दामोदर आवारी यांच्यावर आज दु. 11.30 वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ले. कर्नल वासूदेव यांचे मुळ गाव असलेल्या मुर्धोनी येथील सामुदायिक प्रांगणात झालेल्या अंत्यसंस्काराला आर्मीचे अधिकारी, पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व लोक प्रतिनिधी यांच्यासह वणी आणि परिसरातील गावातील हजारोंचा जनसागर उपस्थित होता. भावपूर्ण व शोकाकूल वातावरणात झालेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी अनेक उपस्थित नागरिकांना अश्रु अनावर झाले.

गुरुवारी रात्री उशिरा ले. कर्नल वासूदेव यांचे पार्थिव मुर्धोनी येथे नेण्यात आले. आज शुक्रवारी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी 11 वाजताच्या दरम्यान संपूर्ण गावातून अंत्ययात्रा निघाली. यावेळी ‘भारत माता की जय’… ‘अमर रहे अमर रहे, शहीद वासूदेव आवारी अमर रहे’, ‘वंदे मातरम’ अशा जयघोषांची गुंज संपूर्ण गावात ऐकू येत होती. अंतयात्रा जाताना घराघरातून त्यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षांव करत श्रद्धांजली वाहण्यात आली. अंत्ययात्रेनंतर सामुदायिक प्रांगणात त्यांचे पार्थिव नेण्यात आले.

दुपारी 11.30 वाजताच्या दरम्यान अंत्यसंस्कारासाठी सामुदायीक प्रांगणात हजारोंचा जनसागर उसळला होता. सुरवातीला ले. कर्नल वासूदेव आवारी यांना लष्करांनी सलामी दिली. त्यानंतर पोलीस पोलीस विभागातर्फे सलामी देण्यात आली. यावेळी पोलीस विभागातर्फे फायरिंग करून मानवंदना दिली गेली. त्यानंतर कुटंबीयांनी श्रद्धांजली वाहिली.

वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ . शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, तहसीलदार निखिल धुळधर, ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनी श्रद्धांजली वाहली. त्यानंतर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी खासदार हंसराज अहिर, विश्वास नांदेकर, संजय देरकर, राजू उंबरकर, विजय चोरडिया, तारेन्द्र बोर्डे व इतर सामाजिक व राजकीय संघटनांकडून पार्थिवावर पुष्पांजली अर्पित करण्यात आली. अंत्यसंस्कारानंतर आयोजित शोकसभेत अनेक गणमान्य व्यक्ती तसेच स्व. ले. कर्नल वासुदेव आवारी यांचे वडील दामोदर आवारी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

वीरगती प्राप्त झाल्याचा अभिमान – वीरपिता दामोदर आवारी
शोकसंवेदना व्यक्त करताना स्व. वासूदेव यांचे वडील दामोदर आवारी यांनी वासूदेव यांच्या बालपणीच्या व तरुणपणीच्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या मुलाचा मृत्यू झाला याचे दु:ख असले, तरी मातृभूमीचे रक्षण त्याला वीरगती प्राप्त झाली याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शिवाय युवा पिढीने सैन्यदलात जावून देशसेवा करावी असा संदेशही त्यांनी तरुण पिढीला दिला. त्यांच्या शोकसंवेदना सुरू असताना उपस्थित जनसागर भावूक झाला होता.

ले. कर्नल आवारी यांचे पार्थिव गुरुवारी रात्री 8.30 वाजता नागपूर येथून वणी येथे आणण्यात आले. पार्थिव येणार असल्याचे कळाल्याने गावागावातील नागरिक रात्री रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. गावातून ताफा जाताच त्यांनी फुलांचा वर्षांव करत व ‘वासूदेव आवारी अमर रहे’च्या घोषणा देत त्यांनी वासूदेव आवारी यांना श्रद्धांजली वाहिली. रात्री 8.30 वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव वणी येथे पोहोचले. यावेळी त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी हजारो नागरिकांची गर्दी उसळली होती. रात्री 11.30 वाजता त्यांचे पार्थिव मुर्धोनी येथे आणण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.