राजू उंबरकर यांच्या हस्ते ‘पल्याड’ मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

जगप्रसिद्ध फोर्ब्स मॅगजीनने घेतली चित्रपटाची दखल.. फिल्म फेस्टिव्हलमध्ये पटकाविले 17 पुरस्कार

जितेंद्र कोठारी, वणी : चंद्रपूरच्या मातीमध्ये तसेच चंद्रपूरच्या स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन बनविण्यात आलेले ‘पल्याड’ ह्या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांचे हस्ते करण्यात आले. मंगळवार 4 ऑक्टो. रोजी वणी येथील शेवाळकर परिसरात आयोजित मनसे गरबा महोत्सव कार्यक्रमात सहनिर्माता रोशनसिंह बघेल, सहा. दिग्दर्शक तुषार चाहरे, सहा. सिनेमाटोग्राफर भूषण तपासे व टीम मेम्बर पंकज मलिक व सुरज उमाटे यांच्या उपस्थितीत पोस्टर अनावरण सोहळा पार पडला. 
पल्याड ही मराठी फिल्म समाजातील रूढी,परंपरा ज्या परंपरांना आताच्या जगामध्ये कोणी मानत नाही, अश्या रूढी, परंपरांना मानणारी एका छोट्याश्या आणि गरीब कुटुंबाची कथा आहे.  मराठी फिल्म अभिनेता शशांक शेंडे, देविका दफ्तरदार आणि माझ्या नवऱ्याची बायको या सिरीयल मधील अभिनेता देवेंद्र दोडके तसेच बल्लारपूर येथील बाल कलाकार रुचित निनावे, विरा साथीदार,सायली देठे, गजेश कांबळे हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तसेच भारत रंगारी, बबिता उईके, सुमेधा श्रीरामे, रवींद्र धकाते, सचिन गिरी, रवींद्र वांढरे, रोशनसिंघ बघेल अविनाश चंदणकर, शुभम उगले, समीर विरुटकर, राजू आवळे हे कलावंतानी यात अभिनय केले आहे.
फिल्म फेस्टिव्हल समारंभात ‘पल्याड’ चित्रपटाला 17 पुरस्कार मिळाले असून जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ पत्रिकेने या चित्रपटाची दखल घेतली आहे. 4 नोव्हेंबर 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पल्याड हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पोस्टर अनावरण कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चित्रपटातील संपूर्ण कलाकारांना शुभेच्छा देण्यात आली.

Comments are closed.