नागेश रायपुरे, मारेगाव: अडेलतटू धोरणामुळे नेहमीच चर्चित असलेल्या येथील भूमिअभिलेख कार्यालय वादग्रस्त ठरत आहे. सामान्य नागरिकांना इथे नेहमीच हेलपाटे मारावे लागत असल्याचं नागरिक सांगत आहेत. या कार्यालयातील एक अधिकारी व दोन कर्मचारी फेरफार नक्कल देण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे. त्याच कारणास्तव यांच्या विरोधात मारेगाव तहसिलदार यांच्याकडे एका युवकाने तक्रार दिली आहे.
स्वप्निल विनोद नागोसे असे तक्रार करणाऱ्या सुज्ञ युवकाचे नाव आहे. स्वप्निल यांनी स्वतःच्या प्लॉट न.107 ची फेरफार नक्कल मिळण्याची दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी भूमिअभिलेख कार्यालयात रीतसर अर्ज केला. मात्र फेरफार नक्कलसाठी दोन महिन्यांचा कालावधी होऊनही मिळाली नाही. नागोसे यांनी येथील अधिकारी पवार, कर्मचारी सोयाम, प्रभेश ढाके यांना फेरफार नक्कलची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केली.
यामुळे संतप्त झालेल्या तक्रारदार स्वप्निल यांनी येथील अधिकारी व दोन कर्मचारी विरोधात फेरफार नक्कल देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या आरोपाखाली तहसिलदार यांच्याकडे तक्रार दिली आहे.
येथील भूमिअभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभाराला शेतकरी नागरिक पुरते वैतागलेत. मागील वर्षभरापासून अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे बोलले जाते. येथील अधिकारी कर्मचारी सध्या “दाम करी काम’ ची भूमिका घेत असल्याने यांचे विरोधात रोष व्यक्त करत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)