उभे ट्रक ठरतायेत यमदूत, दोन तरुणांचा गेला नाहक जीव

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव जवळील लालपुलीया परिसरात सकाळी झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जीव गेला. उभ्या ट्रकचा धक्का लागल्याने चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे उभे ट्रक पुन्हा एकदा यमदूत ठरला आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातच दोन तरुणांचा उभ्या ट्रकला दुचाकीची धडक बसल्याने अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या 8 दिवसानंतरच हा दुसरा अपघात झाला आहे. अपघातात दोन तरुण पाहुण्यांचा जीव गेल्याने संतप्त झालेल्या जमावाने ट्रकची तोडफोड करत मृतदेह उचण्यास मज्जाव केला व यवतमाळ मार्गावरील वाहतूक रोखून धरली. अखेर ठाणेदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन जमावाची समजूत काढल्यानंतर जमाव शांत झाला. यामुळे सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

चिखलगाव येथे असलेल्या मेघदूत कॉलोनी येथील रहिवासी असलेले महादेव कांबळे यांच्या घरी गुरुवारी लग्नकार्य होते. त्यानिमित्त त्यांच्या घरी पाहुणे आले होते. आज शुक्रवारी दिनांक 12 मे रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या घरातील दोन पाहुणे स्वप्नील माणिक तांदूळकर (22) रा. ऊर्जानगर जि. चंद्रपूर व जीवन अनंत कांबळे (15) रा. पडोळी जि. चंद्रपूर हे पॅशन या दुचाकीने (Mh 29 AH 8391) नाष्ट्याच्या प्लेट, कप व इतर साहित्य आणण्यासाठी वणीला आले होते. सामान परत घेऊन ते मेघदूत कॉलनीत परत जात होते.

9 वाजताच्या सुमारास देशप्रेमी हॉटेल जवळ रस्त्याच्या कडेला एक ट्रक उभा होता. ट्रकला ओव्हरटेक करताना या उभ्या ट्रकचा पल्ला दुचाकीला लागला त्यामुळे दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व ते दोघेही खाली पडले. त्याच दरम्यान मागून येणारा ट्रकने (MH34 BG 1983) दोघांनाही चिरडून टाकले. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकमुळे दोघांच्याही छाती पासून वरच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. तर ट्रकमुळे दोघांच्या रक्त हे रस्त्यापासून काही फूट उडाले.

अपघात होताच ट्रकचालक ट्रक जागेवर ठेवून फरार झाला. अपघातामुळे घटनास्थळावर लोकांची गर्दी झाली. दरम्यान काही वेळ दोन्ही मृतदेह रस्त्यावरच पडले होते. बराच वेळ झाल्याने स्वप्निल व जीवन घरी न आल्याने एकाने त्यांना फोन केला असता दोघांचाही अपघात झाल्याची माहिती कांबळे कुटुंबियांना मिळाली. कांबळे कुटुंबीय तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी संतप्त नातेवाईकांनी ट्रकवर दगडफेक करून ट्रकच्या काचांची तोडफोड केली. दरम्यान याच वेळी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले.

दोन तास रास्ता रोको
उत्तरिय तपासणीसाठी मृतदेह उचलण्यास उपस्थित जमावाने मज्जाव केला. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर एसडीपीओ संजय पुज्जलवार, ठाणेदार प्रदीप शिरस्कर, स.पो.नि माया चाटसे हे ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतकाच्या नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर जमाव शांत झाला व वाहतूक सुरळीत झाली. रास्ता रोको केल्याने सुमारे दोन तास वणी-यवतमाळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

उभे ट्रक ठरतायेत यमदूत
गेल्या काही दिवसात उभ्या ट्रकमुळे परिसरात अनेक अपघात झाले आहे. यात अनेकांचा जीव देखील गेला आहे. तर अनेक चालक जखमी देखील झाले आहेत. राजूर रोड, लालपुलीया परिसरात अशा अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहे. या मार्गावर धरमकाटा असल्याने उभ्या ट्रकची मोठी रांग या ठिकाणी दिसून येते. शिवाय अनेक बंद अवस्थेत असलेले ट्रक देखील रस्त्यावर अनेक दिवस उभे असतात. याविरोधात अनेकांनी आवाज उठवला होता. मात्र प्रशासनाने याकडे कायम दुर्लक्ष केल्याचे आढळून येते. हेच उभे ट्रक आता यमदूत ठरताना दिसत आहे. याच उभ्या ट्रकमुळे तरुणाचा जीव गेल्याचे बोलले जात आहे. आता तरी प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल आता विचारला जात आहे.

Comments are closed.