जोतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव शहरासह तालुक्यात ७४वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मारेगाव नगरपंचायतमध्ये नगराध्यक्षा रेखा मडावी यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी सर्व नगरसेवक गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. नवरगाव, महागाव कोलगाव, मांगरुळ, कुंभा, मार्डी या ठिकाणी ग्रामपंचायत व जि.प.शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करुन, स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांच्या कार्याचा गौरव करुन विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
सर्व महाविद्यालये, शाळांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. मारेगाव पोलिस स्टेशनमध्ये पो.नि. दिलीप वडगावकर यांचे हस्ते तिरंगा ध्वज फडकविला. तर वनविभाग मारेगाव कार्यालयात क्षेत्र सहाय्यक नितेश आकुलवार यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. स्वामी विवेकानंद महाविद्यालयात संस्थेचे संचालक अनामिक बोढे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर मारेगाव तहसील कार्यालयात तहसीलदार दीपक पुंडे यांचे हस्ते ध्वजारोहण मोठ्या उत्साहात झाले.
सर्व शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शहरातील मुख्य मार्गावरील प्रभातफेरीने शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. स्वातंत्र्यदिनानिमित्य स्वरधारा गृपच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी स्वरधारा गृपचे नागेश रायपुरे, अशोक कोरडे, आकाश बदकी, आशीष येरमे, विवेक बोबडे, श्रीकांत सांबजवारसह स्वरधारा गृपच्या सर्व सदस्यांनी सहभाग नोंदवित कार्यक्रम यशस्वी केला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शहरात समोसा, आलुबोंड्याची विक्री विक्रमी झाली आहे हे विशेष.