इंदुरीकर महाराजांचा वणी येथील कीर्तन कार्यक्रम रद्द

पुढील तारीख लवकरच होणार जाहीर, चाहत्या़ची निराशा

जितेंद्र कोठारी, वणी: येथील शासकीय मैदानावर शुक्रवार 3 नोव्हेंबर रोजी आयोजित कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा पाठींबा देत इंदुरीकर महाराज यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केल्याचे समजते. वणी येथील कीर्तन कार्यक्रम रद्द करण्याबाबत आयोजकांना कळविण्यात आले आहे. पुढील तारीख लवकरच कळवली जाणार असे आयोजकांतर्फे माहिती देण्यात आली. 

आपल्या विनोदी कीर्तनातून सर्वाचे प्रबोधन करणारे तसेच लहानापासून ते वयस्कराना कीर्तनाच्या माध्यमातून स्वतःकडे आकर्षित करणारे कीर्तनकार महाराज म्हणून त्यांची मोठी ख्याती आहे. वणी येथील गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था व रेणुका इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 3 नोव्हेंबर रोजी इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील लाखोच्या संख्येने नागरिक इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ऐकण्याची आतुरतेने वाट बघत होते. मात्र ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाल्याचे कळताच नागरिकांची निराशा झाली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील व्यक्ती त्यांना पाठिंबा देत आहे. दरम्यान कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी देखील मराठा आक्षणासाठी पाठिंबा देऊन पुढील 5 दिवसांचे त्यांचे सर्व कीर्तन कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली. वणी येथील इंदुरीकर महाराज यांचे कार्यक्रम तूर्तास स्थगित झाले आहे. मात्र पुढील तारीख घेऊन वणी येथे कीर्तनाचा कार्यक्रम ठेवणार असल्याची माहिती टिकाराम कोंगरे यांनी दिली आहे.

Comments are closed.