प्रवाशांच्या खिशाला झळ, खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट

दिवाळीत खासगी बसच्या तिकीट दरामध्ये अडीचपट वाढ

जितेंद्र कोठारी, वणी : दिवाळी आणि सुट्ट्यांच्या हंगामाचा मुहूर्त साधत खासगी बसचालकांनी तिकीट दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरी येणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. वणी तालुक्यातील हजारो विद्यार्थी पुणे, मुंबई येथे राहून उच्च शिक्षण घेत आहे. दिवाळीचा सण कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी अनेक जण आपल्या गावाकडे परततात. त्यामुळे या काळात प्रवाश्यांच्या संख्येत मोठी वाढ होते. प्रवाश्यांच्या या गर्दीचा फायदा घेऊन ट्रॅवल्स संचालकांनी आपले दर वाढविले आहे.

चंद्रपूर ते पुणेकरीता वणी मार्गे प्रसन्ना ट्रॅव्हल्स, विदर्भ ट्रॅव्हल्स, डीएनआर ट्रॅव्हल्सच्या दररोज 6 स्लीपर कोच बसेस धावतात. साधारण दिवसात या ट्रॅव्हल्सचे वणी ते पुणे व पुणे ते वणी पर्यन्त 1200 ते 1800 रुपये प्रतिव्यक्ति तिकीट आहे. मात्र दिवाळी हंगामात प्रवाश्यांच्या संख्येत वाढ लक्षात घेऊन ट्रॅवल्स चालकांनी तिकीट दर 3500 ते 4000 पर्यन्त वाढविले आहे. ट्रॅवल्स चालकांच्या मनमानीमुळे  प्रवाश्यांची लूट होत आहे. स्वत:ची दिवाळी साजरी करीत ट्रॅवल्स कंपन्यांनी प्रवाशांचेच दिवाळे काढण्यास सुरुवात केली आहे.

शासन निर्णयाच्या मर्यादेपेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसेसवर प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कारवाई करावी, असे आदेश परिवहन उपआयुक्तांनी दिले आहेत. सण, सुट्ट्यांच्या हंगामात खासगी बसचालकांकडून सर्रास लूट होत असताना मात्र यवतमाळ व चंद्रपूर येथील आरटीओकडून केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. परिवहन महामंडळाच्या बसेचच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट तिकीट आकारणी करण्याची सूट शासनाने खाजगी बस कंपन्याना दिलेली आहे. तसेच बसेसना फक्त स्रोत ते गंतव्य (source to destination) प्रवाशी वाहतुकीची परवानगी असताना या खाजगी बस चालकांकडून खुलेआम टप्पा वाहतूक केली जाते.

अवाजवी तिकीट आकारणी करणाऱ्या बसेसवर कारवाई करणार

दिवाळीच्या हंगामात प्रवाश्यांकडून दुप्पट तिकीट आकारणी होत असल्याची अनेक प्रवाश्यांची तक्रार आहे. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या तिकीट दरापेक्षा जास्तीची तिकीट वसूल करणाऱ्या खाजगी बसेसवर येत्या एक दोन दिवसात कारवाई करणार आहोत.

ज्ञानेश्वर हिरडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, यवतमाळ

 

 

 

 

Comments are closed.