जब्बार चीनी, वणी: मार्डी येथील बार विषयी आलेल्या तक्रारीची दखल घेत तिथे असलेल्या स्टॉकबाबत उत्पादन शुल्क विभागाने तपासणी सुरू केल्याची माहिती मिळत आहे. याआधी यवतमाळ, राळेगाव व जिल्ह्यातील काही ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाद्वारा तपासणी करण्यात आली आहे. स्टॉक कमी असल्यावरून एकावर कारवाई करत परवाना रद्द करण्यात आला आहे. वणीतही असे अनेक बार आहेत ज्यात बाहेरून सिल लावले असले तरी मागच्या दारातून दारू काढली जात असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ‘बाहेर सिल, आत स्टॉक गायब’ अशी परिस्थिती काही बारची झाल्याचे दिसून येते.
लॉकडाऊन दरम्यान अवैध दारू विक्री व तस्करी करणा-यांवर जिल्हाधिकारी यांनी कठोर कार्यवाही करत परवाना रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6 बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यात वणी येथील अक्षरा बारचाही समावेश आहे. तर यवतमाळ येथील एका ठोक दारू व्यापा-याच्या गोदामाची तपासणी केली असता त्यात स्टॉक कमी आढळून आला, त्यामुळे त्या ठोक व्यापा-याचाही परवाना रद्द करण्यात आला. कुंभा येथील भट्टीचा परवाना रद्द होण्याच्या मार्गावर आहे.
यवतमाळ, मार्डी, राळेगाव येथील बारच्या स्टॉकची तपासणी होत आहे. वणीमध्ये मीडियातून अवैध विक्री व तस्करीच्या तक्रारी येत आहे. मात्र तरी देखील वणीच्या बारला स्टॉकच्या तपासणीतून सुट का दिली जात आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. वणीमध्ये अनेक बारमध्ये आत स्टॉक कमी असल्याचे आढळू शकते.
समोर सिल, पण मागून ‘खुल जा सिम सिम…’
वणीतील सुमारे 80 टक्के बारला मागून दरवाजा आहे. उत्पादन शुल्क विभागातर्फे बार समोरील मुख्य दरवाज्याला सिल करण्यात आले आहे. त्यामुळे मागच्या दाराचा वापर स्टॉक काढण्यासाठी होत असल्याची माहिती मिळत आहे. वणीतील निळापूर रोडवरील एक बार, शिरपूर रोडवरील एक बार, भालर रोडवरील एक बार. यवतमाळ रोडवरील एक-दोन बार तसेच बस स्टॅन्डजवळील एक बारचा यात समावेश असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. या 8 ते 10 बारमधला अर्धा अधिक माल लंपास असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलीस दक्ष, पण अवैध विक्रेते निगरगट्ट…
महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू होऊन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. मात्र लॉकडाऊनचा इतका कालावधी जाऊनही काही गुप्त ठिकाणी अजूनही ब्लॅकमध्ये दारू मिळत आहे. दारूचे दुकान सिल केल्यावरही दारू कशी विकली जाते? हा प्रश्न उपस्थित होणे सहाजीक आहे. वणीतील अक्षरा व कुंभा येथे पोलिसांनी धाड टाकून मोठा साठा जप्त केला होता. तर चौपाटी बार फोडल्याच्या आरोपींना पोलिसांनी एका दिवसात गजाआड केले होते. पोलिसंच्या या कारवाईनंतरही काही बारचालक इतके निगरगट्ट झाले आहेत की ते विविध मार्गाने दारू काढून त्याची छुप्या रितीने विक्री करीत आहे.
बार ठरतोय अलिबाबाची गुहा !
अनेक दारू व्यावसायिकांनी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात विक्रीसाठी काही स्टॉक काढून ठेवला होता. मात्र तो स्टॉक दोनचार दिवसांचा होता. आता महिना होऊनही छुप्या रितीने ब्लॅकमध्ये दारूची विक्री व तस्करी होत असल्याचे समोर येत आहे. पोलीस अशांवर कारवाईही करीत आहे. कधी सील तोडून तर कधी बारच्या मागील बाजूचे दार उघडून बारमधला स्टॉक काढला जात असल्याची माहिती मिळत आहे. सध्या ब्लॅक मार्केटमध्ये दारूचे रेट दुप्पट तिपटीने वाढले आहेत. त्यामुळे बार हा ‘अलिबाबाची गुहा’ तर त्यातील स्टॉक हा मौल्यवान माणिक मोती ठरत आहे. उत्पादन शुल्क विभागाने बारची तपासणी केल्यास सत्य समोर येऊ शकते.
याबाबत उत्पादन शुल्क विभागाला विचारणा केली असता सर्व बारची तपासणी करणे शक्य नाही. पण जे संशयास्पद बार आहे किंवा ज्या बारबाबत तक्रारी येईल त्या बारची तपासणी करता येऊ शकते. अशी प्रतिक्रिया प्रवीण मोहतकर, दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क विभाग वणी यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.
वणीतील संशयास्पद बारची तपासणी उत्पादन शुल्क करणार का? तसेच ज्या बारवर कारवाई करण्यात आली आहे, त्याचा परवाना कधी रद्द होतो याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.