अपघातात जखमी ‘त्या’ विमा अभिकर्त्याचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी : मारेगाव येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंप जवळ 10 एप्रिल रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी वणी येथील विमा अभिकर्त्याचे उपचारादरम्यान नागपूर येथील खाजगी रुग्णालयात शनिवार 15 एप्रिल रोजी मृत्यू झाला. बाबाराव रघुनाथ सुर (49) रा. नवकार नगर, वणी असे मृत विमा अभिकर्त्याचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील रहिवासी बाबाराव सुर हे मागील काही वर्षांपासून आपल्या कुटुंबासह वणी येथे वास्तव्यास होते. ते एलआयसी एजंट म्हणून भारतीय जीवन विमा निगमच्या वणी शाखेत कार्यरत होते. सोबतच कोलगाव येथे वडिलोपार्जित शेती सांभाळत होते. 

बाबाराव सुर सोमवार 10 एप्रिल रोजी कामानिमित्त दुचाकीने मारेगाव येथे गेले होते. काम आटोपून दुचाकीने परत वणीसाठी निघाले असता इंडियन ऑईल पेट्रोल पंप जवळ सायंकाळी 7 वाजता एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी बाबाराव याला तात्काळ मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृति गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे खाजगी दवाखान्यात भरती केले. तिथे उपचारादरम्यान शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

मृतक बाबाराव यांच्यामागे आई, पत्नी, एक मुलगा व मुलगी आहे. शनिवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर वणी येथील मोक्षधाममध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Comments are closed.