जितेंद्र कोठारी, वणी : छत्तीसगढ राज्यातून चोरी केलेले चारचाकी मालवाहू वाहनासह 2 वाहन चोरट्यांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेले महिंद्रा पीकअप वाहन चोरीचा असल्याची खात्री करून अटकेतील आरोपींना छत्तीसगढ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार वणीचे ठाणेदार पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून शनिवार 7 जानेवारी रोजी बाकडे पेट्रोल पंप जवळ एक महिंद्रा पीकअप मालवाहू वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. या वाहनाच्या समोरील भागात CG11 AG O887 तर मागील बाजूस नंबरप्लेटवर CG11 AG O886 असे वेगवेगळे क्रमांक पाहून पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी वाहन चालक रेणुका उर्फ दीपक साहू (19) व त्याचे साथीदार किरण कुमार साहू (19), दोघं रा. दौलत बाजार, पो. स्टे. सर्सिवा, जि. सारंगड, छत्तीसगढ यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. आरोपीने सदर वाहन 5 जानेवारी 2023 रोजी सर्सिवा येथून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीने दिलेल्या कबुलीवरून वणी पोलिसांनी सर्सिवा पोलीस स्टेशन येथे फोनद्वारे माहिती दिली. रविवार 8 जानेवारी रोजी छत्तीसगढ राज्यातील सर्सीवा पोलिसांनी वणी येथे येऊन दोन्ही आरोपी व वाहन आपल्या ताब्यात घेतले.
सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, उप विभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांचे मार्गदर्शनात सपोनी माधव शिंदे, स.फौ. सुदर्शन वानोळे, डोमाजी भादिकर, पोलीस हवालदार सुहास मंदावार, विठ्ठल बुरुजवाडे, हरिंदर भारती, सागर सिडाम, पुरुषोत्तम डडमल यांनी केली.
चोरीच्या वाहनाचा छत्तीसगढ ते वणी प्रवास ?
छत्तीसगड राज्यातून 5 जानेवारी रोजी चोरी करुन महिंद्रा पिकअप वाहन चोरट्यांनी थेट वणीत आणल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे. वाहन चोरट्यांना वणी येथे कोणाला वाहन विकायचं होता का ? यापूर्वीही सदर चोरटे वणीत आले होते का ? याबाबत सखोल चौकशी करणे गरजचे आहे.
Comments are closed.