इम्पॅक्ट – अखेर रासा येथील शेतकऱ्याला मिळाला ‘सन्मान’ 

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना लाभार्थी यादीत समाविष्ट,.. शेतकऱ्यानी वणी बहुगुणीचे मानले आभार

जितेंद्र कोठारी, वणी : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळावा, याकरिता तब्बल 10 महिने विविध कार्यालयात पत्रव्यवहार, आपले सरकार पोर्टलवर तक्रारी आणि वणी बहुगुणी न्युज पोर्टलने वेळोवेळी शेतकऱ्याची व्यथा शासन दरबारी मांडली. अखेर पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये त्या शेतकऱ्याचे नाव समाविष्ट करण्यात आले. हक्काचा सन्मान मिळाल्याने त्या शेतकऱ्यांनी वणी बहुगुणीचे आभार मानले आहे.

तालुक्यातील रासा येथील शेतकरी राहुल शामराव धांडे यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये पीएम किसान सन्मान योजनेकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केला. परंतु 6 महिन्यानंतरही सदर शेतकऱ्याच्या अर्जाला शासन स्तरावरुन अप्रुव्हल मिळाले नाही. याबाबत शेतकरी राहुल धांडे यांनी आपले सरकार पोर्टलवर जिल्हाधिकारी यांना तक्रार केली. तक्रारीवरून जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार वणी यांना अहवाल मागितला. दि. 4 जुलै 2022 रोजी तहसीलदार वणी यांनी जिल्हाधिकारी तसेच तक्रारदार शेतकरी यांना पत्र पाठवून 8 मार्च 2021 पासून वणी तहसील कार्यालयात सदर काम बंद असल्याने सदर शेतकऱ्याच्या अर्जाला मान्यता देण्यात आली नसल्याचे कळविले.

त्यानंतर शेतकरी राहुल धांडे यांनी ‘ वणी बहुगुणी ‘ जवळ आपली व्यथा मांडली. याबाबत वणी बहुगुणीने 10 जुलै 2022 रोजी ‘पी.एम. किसान निधीचे काम रखडले, शेतकरी अनुदानापासून वंचित’ व 25 जुलै 2022 रोजी ‘शेतकऱ्याची थट्टा, सन्मान निधी देण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाचे हात वर’ या मथळ्याखाली विस्तृत बातम्या प्रकाशित केल्या. 

वणी बहुगुणीने केलेला पाठपुरावा तसेच स्वतः शेतकरी राहुल धांडे यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, मंत्रालय ते कृषी आयुक्तालय पुणे असा लांबलचक व प्रदीर्घ संघर्ष केल्यानंतर 3 डिसेंबर 2022 रोजी शेतकरी सन्मान योजनेसाठी त्याच्या नावाची अधिकृत नोंदणी करण्यात आली. याबाबत कृषी आयुक्त पुणे कार्यालय यांनी ईमेल वरून शेतकरी राहुल धांडे यांना कळविले आहे. शेतकऱ्याच्या या संघर्षात वणी बहुगुणीने वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल शेतकरी राहुल धांडे यांनी धन्यवाद प्रकट करुन आभार मानले आहे.

हे देखील वाचा – 

‘पीएम-किसान सन्मान निधी’चे काम रखडले, शेतकरी अनुदानापासून वंचित

शेतकऱ्याची थट्टा: सन्मान निधी देण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाचे हात वर

 

Comments are closed.