विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी रात्री चिखलगाव येथे चालणाऱ्या आयपीएल सट्टयावर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी सहा जणांना पोलिसांनी अटक केली. या धाडीत सहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. चिखलगाव येथील चोपडा यांच्या घरी हा सट्टा सुरू होता.
गेल्या काही दिवसांपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरू आहे. परिसरात आयपीएलवर सट्टा लावणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु इतक्या दिवसात पोलीस प्रशासन एकही कारवाई करू शकले नव्हते. अखेर गुरुवारी रात्री कोलकत्ता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू होता. चिखलगाव येथे चोपडा यांच्या घरी मॅचवर सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक यांना मिळाली. माहितीवरून नाईक यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चोपडा यांच्या घरी धाड टाकली.
त्या ठिकाणी या सामन्याच्या प्रत्येक चेंडूवर जुगार सुरू होता. जुगार खेळणाऱ्यापैकी राजू हरकचंद बोरा (53), संजय मार्केन्डेय मेंटपल्लीवार (35), निहाल दिनेश मोडस (20), सैय्यद इमरान सैय्यद इकबाल (24), गणेश मारोती मींचेवार (36), आकाश दीपक जजुलवार (26) सर्व राहणार पांढरकवडा यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आयपीएल जुगाराला लागणारे साहित्य लॅपटॉप, कॅलकुलेटर, एक चारचाकी स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक MH 29 DK 0031, व नगदी 10 हजार 580 रुपये असा एकूण 6 लाख 58 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सहाही जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 4,5 नुसार गुन्हा नोंद केला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, सहाय्यक पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नाईक, इकबाल शेख, शैलेश जाधव, रवी इसनकर, आशिष टेकाडे, प्रदीप ठाकरे यांनी केली.