सदनिका हेराफेरी प्रकरणात आरोप प्रत्यारोंपाच्या फैरी
गणेशपूर येथील बिल्डरच्या विरूध्द ग्राहकांचा एल्गार
रवि ढुमणे, वणी: वणी शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील छोरिया लेआउट मध्ये नागपूरातील बिल्डरांनी सदनिका तयार केल्या. त्या ग्राहकांना देवून त्यावर स्वतः कर्ज उचलण्याचा प्रकार करून स्वतःचा मालकी हक्क प्रस्थापित केली असल्याच्या तक्रारी यापूर्वी करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात बिल्डरांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. मात्र त्या बिल्डरने पलटवार करीत ग्राहकांच्या विरूध्द उपविभागीय अधिकारी यांचेकडे सदनिका रद्द केल्याचा अर्ज सादर केला आहे.
गणेशपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणा-या छोरिया लेआउटमध्ये ‘आर्यर हेरीटेज’ कंपनीने 36 गाळ्यांच्या सदनिकेचे बांधकाम 2015 मध्ये केले होते. सदर गाळ्यांसाठी 80 ते 90 टक्के रक्कम पूर्ण देवून सुध्दा पुर्णतः ताबा दिला गेला नाही. परिणामी संजय दहेकर, हरलाल चैधरी, फाल्गून बगमारे, छत्रपती डोंगे, संदीप मुजगेवार, रतन गिरी, अमित अगरवाल यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यांमुळे ग्राहकांनी उपविभागीय अधिकारी यांचकडे उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
मात्र आर्यन हेरिटेज कंपनीचे संचालक योगेष पंजाबी यांनी सदर ग्राहकांनी त्यांना मानसिक त्रास देवून वेळोवेळी रक्कम पूर्ण न दिल्याने संबधीत ग्राहकांच्या सदनिका रद्द करण्यासंबधीचा अपिल अर्ज उपविभागीय अधिकारी यांचकडे टपालाद्वारे पाठवित पलटवार केला आहे. यात एका बाजूने सामान्य ग्राहकांनी स्वप्नातील घर स्वप्नातच रंगवून त्याचे पैसे देवून सुध्दा बिल्डरांनी त्यांना घर न दिल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.
(हे पण वाचा: खोटा सर्च रिपोर्ट केल्याप्रकरणी नामवंत वकिलावर गुन्हा दाखल)
सुपारी घेवून मानसिक त्रास दिल्याचा बिल्डरचा आरोप
गाळे सदनिकेचा करार करणा-या ग्राहकांनी गावातीलच बिल्डरांकडून सुपारी घेवून मानसिक त्रास दिल्याचा आरोप करीत सदर सदनिका करार रद्द करण्यात येत असल्याचा पलटवार संबधीत बिल्डरने केला आहे. मात्र या आधी एका पतसंस्थेच्या तक्रारीवरून संबधीत बिल्डरवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे हे विशेष.
(आपल्या जवळ असणा-या न्यूज किंवा पब्लिश झालेल्या न्यूज संबंधी संपर्क साधू शकता, निकेश जिलठे- संपादक, वणी बहुगुणी 9096133400)