यंदा जैताई नवरात्रात ‘हे’ होईल, ‘हे’ होणार नाही

उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा मंदिर समितीचा निर्णय

0

जीतेंद्र कोठारी, वणी: यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जैताई देवस्थानाच्या नवरात्रात काही गोष्टी होतील. काही गोष्टी होणारच नाही. साधेपणाने आणि आवश्यक त्या गोष्टींसह हे नवरात्र साजरा करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे.

जैताई मंदिरात दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमासह साजरा होतो. मात्र यंदा कोरोना महामारी आणि लॉकडाऊन नियमांच्या अधिनस्थ राहून नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. जैताई मंदिर संचालक मंडळ आणि जैताई अन्नछत्र समिती यांच्या संयुक्त सभेत हा निर्णय घेण्यात आला.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी 6 च्या आरतीला मंदिरात फक्त पाच भक्तांनाच प्रवेश राहील. मंदिराच्या चॅनेलगेट मधून ओटी स्वीकारून पुजाऱ्याकडून ती देवीला अर्पण करण्यात येईल.

चॅनेलगेटमधून भक्ताला देवीचे स्पष्ट दर्शन होईल. देणगी स्वीकारण्याची व्यवस्था सकाळी 8 ते सायं 7 वाजेपर्यंत राहील. मंदिरात एका वेळेस फक्त 5 भक्तांनाच प्रवेश करता येईल. देवी दर्शन करणाऱ्या भक्तांना तोंडावर मास्क लावणे व योग्य अंतर ठेवणे बंधनकारक राहील.

या सभेच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र नगरवाला होते. सभेचे संचालन माधव सरपटवार यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून मुन्नालाल तुगनायत होते. तर मुन्ना पोद्दार, राजा जयस्वाल, संचालक किशोर साठे, जयंत लिडबिडे, मयूर गोयनका, दिवाण फेरवानी, विजया आगबत्तलवार, विजया दहेकर, मंदा बांगरे, माया माटे, सुरेखा वडीचार इत्यादीची उपस्थिती होती. आभार नामदेव पारखी यांनी मानले.

दिवंगत निष्ठावंतांचं स्मरण

जैताईचे निष्ठावान भक्त व उत्साही कार्यकर्ते गुलाबराव खुसपुरे, लक्ष्मणराव बोदाडकर व पंडित भवानीशंकर पाराशर यंदा कालवश झाले. त्यानिमित्त या सभेत त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना मूक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. पं. भवानीशंकर पाराशर यांचा परिसरात लौकिक होता. आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचं मानाचं स्थान होतं. विविध देवस्थानाच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा होता. लक्ष्मणराव बोदाडकर हे नवरात्री उत्सवात विविध सेवा देत. रोज नित्यनेमाने नवरात्री उत्सवातील विविध जबाबदाऱ्या ते कौशल्याने सांभाळत.

दिवगंत गुलाबराव खुसपुरे अक्षरसेवा करताना मागील वर्षी टिपलेले चित्र

अक्षरसेवक गुलाबराव

दिवंगत गुलाबराव खुसपुरे हे देवस्थानातील विविध उपक्रमांत सक्रीय होते. सकाळच्या योगासनवर्गात त्याचा मोलाचा वाटा होता. अन्नछत्र समितीतही त्यांचं मोठं योगदान होतं. याही पलीकडे गुलाबरावांचा एक खास गुण होता. तो म्हणजे त्यांचं अक्षर. दरवर्षी नवरात्रातात कार्यक्रम होतात. या कार्यक्रमाचं रोजचं शेड्यूल ते आपल्या सुवाच्च अक्षरात फळ्यावर लिहीत. आमचे प्रतिनिधी सुनील इंदुवामन ठाकरे ह्यांच्या संग्रही त्यांचा अक्षरसेवा करतानाचा फोटो होता. गुलाबरावांचं स्मरण करताना हा फोटो आम्ही देत आहोत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.