जम्मूची भंडारा कारागृहात रवानगी, 1 वर्षासाठी स्थानबद्ध

एमपीडीए अंतर्गत अनेक लोक रडारवर !

विवेक तोटेवार, वणी: वणीतील जमीर उर्फ जम्मू खान याच्याविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. जम्मू यास पोलिसांनी सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. रात्री पर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्याला 1 वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. सध्या त्याला भंडारा येथील कारागृहात स्थानबद्ध केले आहे. ठाणेदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या प्रस्तावावरून जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी याबाबत आदेश दिले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी झोपडपट्टी दादा, गुंड, दादागिरी करणारे, तस्कर, अवैध दारू विक्रेते, अन्न भेसळ, पायरसी, धोकादायक व्यक्ती इत्यादींविरोधात एमपीडीएची कारवाई करण्यात येते.

काय आहे एमपीडीए कायदा?
एमपीडीए (MPDA) म्हणजे ‘महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज’ कायदा (Maharashtra Prohibition of Dangerous Activities Act) कायदा. 1981 मध्ये हा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार धोकादायक व समाजविघाटक व्यक्तींना सहा महिने किंवा 1 वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यात येते. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी ही कारवाई केली जाते. वणी शहरात ही पहिलीच कारवाई केल्याची माहिती आहे. आधी केवळ झोपडपट्टी दादा, गुंड, तस्कर इत्यादींवरच अशी कारवाई करण्यात येत होती. मात्र अलिकडे रेती तस्करांवर देखील अशा पद्धतीची कारवाई होत आहे. याविरोधात हायकोर्ट, मंत्रायल यांच्याकडे दाद मागता येते.

कोण आहे जम्मू खान ?
जमीर उर्फ जम्मू खान याची परिसरात जम्मूभाई नावाने ओळख आहे. तो आमीर बिल्डर ऍन्ड या व्यावसायिक प्रतिष्ठानाचा संचालक आहे. मात्र त्याची खरी ओळख सट्टा किंग म्हणून आहे. जम्मूविरोधात मटका, सट्टा, दंगल, जुगार, गुंडगिरी, मालमत्तेचे नुकसान असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

अनेक लोक रडारवर?
पुढेही अशा स्वरुपाचे शांतता भंग करणारे, शरीराविरुध्द व संपत्तीविरुध्द गुन्हे करणारे, धोकादायक गुन्हेगार तसेच वाळु तस्करी, गावठी हातभट्टी दारु विषयक गुन्हेगारांविरुध्द एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत जास्तीत जास्त कारवाई करण्यासाठी अशा गुन्हेगारांची जंत्री गोळा करणे सुरु आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या जास्तीत जास्त कारवाई प्रस्तावीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेतीतस्कर, गावगुंड यांचे धाबे दणाणले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.