उकणी येथील शेतक-यांचे लवकरच भूसंपादन, आंदोलन स्थगीत
वेकोलि प्रशासन, खा. धानोरकर यांच्याशी प्रकल्पग्रस्तांची सकारात्मक चर्चा
बहुगुणी डेस्क, वणी: नजिकच्या उकणी येथील प्रकल्पग्रस्तांच्या भूसंपादनाचा प्रश्न सुटतच नव्हता. अखेरीस हे सर्व शेतकरी 9 जून रोजी जलसमाधी आंदोलन करणार होते. मात्र खा. प्रतिभा धानोरकर व वेकोलि अधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. शनिवारी ताडाळी येथे वेकोलि अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत शक्य तेवढ्या लवकर भूसंपादनचे काम होईल, असे आश्वासन दिल्यानंतर जलसमाधी आंदोलन स्थगित झाल्याचं शेतकरी संघर्ष समितीनं जाहीर केलं. समितीनं या संदर्भात गेल्या आठवड्यात खा. प्रतिभा धानोरकर यांच्या पुढ्यात हा विषय मांडला होता. यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. त्यांना आशेचा किरण दिसायला लागला आहे.
उकणी या क्षेत्रातील 85 टक्के जमीन वेकोलिने संपादित केली. परंतु 15 टक्के जमीन जी 600 एकर आहे. या भूमीवर 175 शेतकरी उदरनिर्वाह करतात. ही जमीन वेकोलिने संपादित न केल्याने या शेतकऱ्यांना ही जमीन सोडावी लागेल. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. 600 एकर जमिनी तत्काळ संपादित करून त्याचा मोबदला व आश्रितांना नोकरी देण्यात यावी. उकणी गावाचे पुनर्वसन तत्काळ पूर्ण करण्यात यावे, 2025 चे सी एस आर रेटनुसार मूल्यांकन करून त्यानुसार मोबदला द्यावा. इत्यादी मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अखेर वेकोलि विरोधात 9 जून रोजी जलसमाधी आंदोलनाची घोषणा शेतकरी संघर्ष समितीने केली होती.
बुधवारी दिनांक 4 जून रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने खा. प्रतिभाताई धानोरकर यांची वरोरा येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली. खा. धानोरकर यांनी वेकोलिच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्यात. त्यानंतर शनिवारी चंद्रपूर ताडाळी येथे वेकोलि मुख्यालयात प्रकल्पग्रस्तांनी अधिका-यांशी भेट घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी जमिनीचे सर्वेक्षण झाले असून भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याची माहिती दिली. सकारात्मक चर्चेअंती उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या चर्चेला वेकोलिचे महाप्रबंधक संचालन सुजीत कुमार पीशारोड़ी, क्षेत्रीय योजना अधिकारी प्रदीप राघोटे, क्षेत्रीय योजना अधिकारी, क्षेत्रीय स. महाप्रबंधक समीर बारला, क्षे. सर्वे प्रबंधक आर बी सिंह, वरीष्ठ प्रबंधक एल एस थोरात, वे.को.लि. सुरक्षा समिति सदस्य संजय खाड़े तसेच शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश विट्ठलराव ढपकस, कार्याध्यक्ष अमोल विठ्ठलराव पुरडकर, उपाध्यक्ष पराग मनोहर तुराणकर, सचिव सचिन जुनारकर, सहसचिव सचिन परशुराम लोड़े, कोषाध्यक्ष मनोज घनश्याम खाडे, सदस्य चंद्रकांत बापुजी जिवतोडे, सदस्य पद्माकर बाबाराव झाडे, सदस्य महेश मोतिराम पाटील, सदस्य विकास रमेश लालसरे, सदस्य संतोष मारोती धांडे, सदस्य किसन सिताराम पारशिवे, कायदेशीर सल्लागार अॅड. सूरज महातळे, मीडिया प्रमुख संजय बाळकृष्ण बांदुरकर, दीपा संतोष टिंगे, उषा ठाकरे, सचिन क्षीरसागर, दीपा संतोष टिंगे इत्यादींची उपस्थिती होती.
Comments are closed.