वणीत आज जनता कर्फ्यूसंदर्भात महत्त्वाची बैठक
शहरात जनता कर्फ्यू लागणार? वणीकरांना उत्सुकता
जब्बार चीनी, वणी: शहरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आज रविवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी वणीत जनता कर्फ्यूबाबत महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. आंबेडकर चौक येथील कल्याण मंडपम येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पक्षाचे प्रतिनिधी तसेच विविध संघटना व घटकांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केल्याची माहिती आहे.
याआधी दिनांक 29 जून रोजी वणीत 5 दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मात्र त्यानंतर जनता कर्फ्यूला राजकीय लागण झाली व त्याच दिवशी संध्याकाळी जनता कर्फ्यूला स्थगिती देण्यात आली. जनता कर्फ्यूबाबत तेव्हा संमिश्र मत होती. काहींनी जनता कर्फ्यूचे समर्थन केले होते तर काहींनी याचा विरोध केला होता.
यावेळी सर्वांना विश्वासात घेतले जाणार?
शहरात 7 वा रुग्ण आढळल्यानंतर 27 जून रोजी तडकाफडकी जनता कर्फ्यूबाबत रेस्ट हाऊसमध्ये मिटिंग लावण्यात आली. यात काही पक्षाचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी व काही पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी समाजातील विविध घटकांची, संघटनांची मत जाणून न घेता तसेच सर्वांना विश्वासात न घेता तडकाफडकी जनता कर्फ्यूचा निर्णय लादण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यात खासदारांनाही विश्वासात न घेतल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त करत या प्रकरणात उडी घेतली. त्यांनी हे प्रकरण प्रतिष्ठेचे करून जनता कर्फ्यूला स्थगिती देण्यासाठी पुढाकार घेतला. अखेर आयोजकांनी जनता कर्फ्यूला स्थगिती दिली होती.
शहरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. शहरात कम्युनिटी स्प्रेडिंग होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जनता कर्फ्यू लावण्यात यावा असा एक मतप्रवाह आहे. तर दुसरीकडे आधीच लॉकडाऊनमुळे व्यवसाय, धंदा मंदावल्याने आता जनता कर्फ्यू नको असा दुसरा मतप्रवाह आहे. जनता कर्फ्यूला सर्वाधिक विरोध व्यापारी वर्गाचा आहे. याशिवाय भाजी, फळ, फुलं यासारख्या गोष्टी नाशवंत आहेत. तडकाफडकी जनता कर्फ्यूचा निर्णय लावल्यास या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्यांचाही याला विरोध आहे.
जनता कर्फ्यूच्या निर्णयाची उत्सुकता शिगेला
संध्याकाळी 7 वाजता होणा-या बैठकीची सर्वांनाच उत्सुकता आहे. एकीकडे शहरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा विषय आहे तर दुसरीकडे लॉकडाऊन, संचारबंदीमुळे पिसलेले छोटेमोठे व्यावसायिक व व्यापारी वर्ग आहे. गेल्या वेळी समाजातील सर्व घटकांना विश्वासात न घेता जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप झाला होता. यावेळी हा आरोप खोडून काढण्याची आयोजकांकडे चांगली संधी आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच व्यापारी संघटना यांच्या भूमिकेचीही सर्वांना उत्सुकता आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याक़डे सर्व वणीकरांचे लक्ष लागले आहे.