‘जनता रॉक्स’ गृपची दिल दोस्ती दुनियादारी
दिवाळीत वणीतील देश विदेशातील मित्रांचा रंगला मैत्री सोहळा
निकेश जिलठे, वणी: फ्रेंड्स जुने होतात पण खूप कमी मैत्रीत जुन्यातही नवे पणा टिकून असतो. असाच प्रत्यय वणीतील कधीकाळच्या मैत्रांच्या मैत्रीचा आलाय. ते सर्व सोबत शिकायचे. हाफ पँट पासून अनवाणी पायानं वणीतील गल्लोबोळातून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे फुल पँट, टाय कोट, बँडेट शूज आणि बाईक कार पर्यंत पोहोचला. त्यातील काही मित्र कामाच्या निमित्ताने परदेशात गेले, तिथेच स्थायिक झाले. तर काही शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने वणीतच स्थायिक झाले. मात्र त्यांची मैत्री जुनी असली तरी त्यांच्या मैत्रीतला निर्मळपणा सदोदित ताजा राहिला. ही कहाणी आहे जनता शाळेत शिकलेल्या मित्रांची. दिवाळीत या सर्व मित्रांचा वणीत मैत्री सोहळा रंगला.
वणीतील अग्रसेन भवन मध्ये रविवारी ‘दिवाली मिलन’ या कार्यक्रमात जनता शाळेत शिकणारे हे सर्व मित्र एकत्र आले. सोबतच त्यांना साथ दिली ती त्यांना घडवणा-या त्यांच्या शिक्षकांनी. शाळेत असताना शिक्षकांसमोर हातावर घडी आणि तोंडावर बोट असलेल्या या सर्व मित्रांचा शिक्षकांसमोरच दंगा सुरू झाला आणि या मैत्रीच्या दंग्यात आता काहीसे थकले असले तरी जुन्याच उर्जेनं शिक्षकही सामिल झाले.
आज कामाच्या व्यापात प्रत्येकजण गुंतुन गेला. त्यातच तीन वर्षांआधी कैलास बोबडे यांच्या मनात शाळेतील जुन्या मित्रांचा वॉट्स ऍपवर गृप सुरू करण्याची कल्पना आली. त्यांनी वॉट्स ऍपवर जनता शाळेत शिकलेल्या मित्रांचा जनता रॉक्स नावाचा गृप सुरू केला. त्यात त्यांनी अनेक मित्र मैत्रिणींना ऍड केले. गृपमध्ये सध्या कोण काय करते याची विचारपूस सुरू झाली. त्यातले अनेक मित्रांचा कुणालाही ठावठिकाणा नव्हता. शोधाशोध सुरू झाली. घरी, इतर मित्रांकडे विचारपूस करण्यात आली. त्यातून अनेक संपर्कात नसलेल्या जुन्या मित्रांचा मोबाईल नंबर मिळाला. अखेर हे सर्व मित्र जनता रॉक्स या गृपमध्ये एकत्र आलेे.
गृपमध्ये गंमत जंमत सुरू झाली. जुन्या मैत्रीच्या किस्स्यांनी गृपला रंगत आणली. मैत्रीचे जुने किस्से ताजे झाले. भेटण्याची हुरहुर वाढू लागली. यातून सर्वांनी भेटायचं ठरलं. दिवाळीला जवळपास प्रत्येकच व्यक्ती वणीत येतो. त्यामुळे दिवाळीत दिवाली मिलन नावाने मैत्री सोहळा करण्याचं ठरलं. हे या मैत्रीसोहळ्याचं तिसरं वर्ष. वणीतील अग्रसेेन भवनमध्ये दुपारी हे सर्व मित्र एकत्र आले. केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर यात परदेशातूनही मित्र त्यांच्या कुटुंबीयासह सहभागी झाले.
सुरुवातीला या मित्रांना घडवणा-या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कान्होबाजी वरारकर, विष्णूपंथ रामगीरवार,. नानाजी राळे, पांडुरंग व-हाटे, सुधाकर जांभुळकर, बोढाले सर, विनायक देरकर, बाळकृष्ण टोंगे, खनगन मॅडम यांचा सत्कार झाल्यानंतर मनोरंजनाच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली. अंताक्षरी, नृत्य, गाणे, मित्रांच्या मुलांसाठी संगीत खुर्ची असे कार्यक्रम रंगले. अनाथ मुलांना पुस्तक वाटण्यात आले.
या कार्यक्रमाकरिता अॅड. संदीप राडे, डाॅ.समीर थेरे, डाॅ. राहुल खाडे, कैलास बोबडे, प्रशांत देरकर, धीरज राजुरकर, स्वप्निल झाडे (कॅनडा), मनिष गोखरे(अमेरिका), संतोष जुनघरी, प्रशांत नक्षणे, गौरव कुचनकर, समीर वाटेकर, संतोष तुराणकर, शंतनू ठाकरे यांच्या सह अनेक माजी विद्यार्थी सहपत्नी आणि कुटुंबीयांसह हजर होते.
आज अनेक मित्र एकत्र आले असले तरी अनेक मित्रांशी संपर्क नाही, तसेच अनेक वर्गमैत्रिणींची अनुपस्थिती जाणवत होती. त्यामुळे जुन्या मित्र मैत्रिणींनी संपर्क साधावा असे आवाहन ऍड संदीप रोडे आणि त्यांच्या मित्रांनी केले आहे.