जिजाऊ नगरमध्ये मोबाईल टॉवर बांधकामाला स्थगिती
निवासी क्षेत्रात होणा-या टॉव्हरला अखिल सातोकर यांनी केला होता विरोध
बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील नगरपरिषद हद्दीतील जिजाऊ नगर परिसरात डिजीटल इंडिया योजनेअंतर्गत मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरू होते. मात्र स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर अखिल सातोकर यांच्या नेतृत्त्वात मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. प्रशासनाने तातडीने दखल घेत कामास स्थगिती दिली. अशी माहिती अखिल सातोकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
जिजाऊ नगरातील प्लॉट क्रमांक 50 हा पूर्णतः निवासी क्षेत्र असून व्यापारी संकुल किंवा व्यवसायासाठी राखीव नाही. तरीही कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोबाईल टॉवरचे काम सुरू करण्यात आले होते. कामगारांनी नागरिकांना परवानगीची आवश्यकता नसल्याचे सांगत धमकी दिल्याचा आरोप रहिवाशांनी केला. अखिल सातोकर यांच्या नेतृत्त्वात नागरिकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. टॉवर उभारणीमुळे परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल, असा मुद्दा मांडण्यात आला. नागरिकांनी काम तातडीने थांबविण्याची मागणी केली.
निवेदनानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत टॉवर बांधकामास स्थगिती दिली. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून अखिल सातोकर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास सार्थकी ठरल्याचे दिसून आले. निवेदन देते वेळी जिजाऊ नगर येथील नागरिक उपस्थित होते.


Comments are closed.