निर्गुडेत उडी घेऊन युवकाने केली आत्महत्या

जैताई मंदिर जवळ पाणीपुरी व चाट सेंटर चालवीत होता मृतक

जितेंद्र कोठारी, वणी : येथील जैताई मंदिर परिसरात राहणाऱ्या एका युवकाने निर्गुडा नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री 9 वाजता उघडकीस आली. राकेश नामदेव म्यानावार (44) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. मृतक जैताई मंदिर समोर पाणीपुरी व चाट सेंटर दुकान चालवीत होता.

प्राप्त माहितीनुसार वणी गणेशपूर मार्गावर निर्गुडा नदीच्या पुलावरून एका व्यक्तीने उडी घेतल्याची माहिती गणेशपूरचे पोलीस पाटील यांनी रात्री 8.30 वाजता दरम्यान वणी पोलीस ठाण्यात दिली. सूचनेवरुन वणी पोलीस स्टेशन येथील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पुलावर एक मोटरसायकल दिसून आली. मोटरसायकलच्या नंबर प्लेटवरुन माहिती काढली असता सदर दुचाकी राकेश म्यानावार याची असल्याचे समोर आले. घटनेबाबत पोलिसांनी लगेच सदर इसमाचा बाबत माहिती काढली असता तो सायंकाळी 6 वाजतापासून बेपत्ता असल्याचे समजले.

पोलिस कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांनी नदीत शोध घेतले असता रात्री 1 वाजता दरम्यान मोक्षधामच्या मागे नदीत मृतक राकेश याचे मृतदेह आढळून आले. मृतदेहाची ओळख पटवून पोस्टमार्टमसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. मृतक राकेश म्यानावार याच्या मागे आई, पत्नी मुलगा (12), मुलगी (9) असून त्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे कळू शकले नाही

राकेश म्यानावार यांचे जैताई मंदिराला लागून खुप वर्षांपासून घर आहे. काही वर्षांपूर्वी राकेश यांनी घरासमोर 4 पक्की दुकाने बांधली. त्यातून 3 भाड्याने दिली तर एका दुकानात तो स्वतः किराणा दुकान चालवीत असे. एका वर्षांपूर्वी राकेश यांनी पाणीपुरी व चाट सेंटर सुरु केला. राकेश व त्याची पत्नीच्या मेहनतीने पाणीपुरी दुकानाला चांगला प्रतिसाद मिळाले. सोमवारी रात्री 8 वाजता जेव्हा राकेश यांनी नदीत उडी घेतली त्यावेळी त्याची पत्नी व मुलगा पाणीपुरी दुकानावर व्यस्त होते.

Comments are closed.