बंटी तामगाडगे, वणी: वनोजा शिवारातील जंगलात मच्छिंद्रा येथील आदिवासी बांधव गेल्या 15 दिवसांपासून सत्याग्रह करीत आहे. परिसरातील आदिवासी आणि स्थानिकांच्या जमिनीवर व वनविभागाला खड्डे खणण्यास विरोध करण्यासाठी हा सत्याग्रह सुरू आहे. शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वात हा लढा सुरू आहे.
यवतमाल जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात येणा-या वनोजा जंगलात कित्येक वर्षांपासून मच्छिंद्रा येथील आदिवासी व स्थानिक पारंपारीक जनजाती शेती करीत आहे. वनजमीन कसणा-या शेतकर्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळावेत यासाठी सन 2006 साली वनाधिकार कायदा तयार करण्यात आला. या शेतकर्यांनी कायद्यानुरूप दावे दाखल केले आहे. तर न्याय मिळण्यासाठी या शेतकर्यांनी पांढरकवडा जिल्हा सत्र न्यायालयात केस देखील दाखल केली आहे. एवढे कायदे व कायद्यानुरूप दावा दाखल केला असतानाही कायद्याचा विरोधात जाऊन वनविभाग शेतात खड्डे खणत आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
शेतकरी किसान सभेचा नेतृत्वात वनोजाच्या जंगलात 15 शेतकरी सत्याग्रह करीत आहेत. वनविभाग बळजबरीने शेतात खड्डे खणत असल्याने वनविभाग व शेतकरी आमने-सामने आले आहेत. वनविभागाने शेतजमीन सोडून पडीत जमीनीवर वृक्षारोपन करावे अशी मागणी किसान सभेचा वतीने किसन मोहुर्ले, श्रीहरी लेनगुरे, सुधाकर सोनटक्के, सुनीता मोहुर्ले, अशोक लेनगुरे, प्रकाश मालेकर, राजहंस बुजाडे, संभा मडावी, तुडशीराम तुमराम, प्रभाकर बावणे, पंचफुला मडावी, लता मालेकर, ताराबाई तुमराम, रूखमाबाई मोहुर्ले, ताराबाई किनाके, शकुंतला लेनगुरे आदिंनी केली आहे.