देवा ही माणसे माणसे होवोत ……

काय मागितलं संत कैकाडी महाराजांनी 'या' पसायदानातून

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: नुकतेच ह.भ.प. रामदास महाराज जाधव यांचं निर्वाण झालं. त्यांना वैचारिक वारसा लाभला तो संत राजाराम उपाख्य कैकाडी महाराजांचा आणि कोंडिराम काकांचा. मानवतेच्या कल्याणासाठी अनेक संतांनी पसायदान मागितलं आहे. वारंवार मागितलं आहे. पसायदान म्हटलं की, लगेच आपल्याला संत ज्ञानेश्वर आठवतात.

विश्वात्मक देवाला मागितलेलं मानवतेच्या कल्याणाचं महादान म्हणजे पसायदान. संत नामदेवांनीदेखील ‘आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा’ हे पसायदान मागितलं होतं. अनेक संतांनी पसायदान मागितल्याचा उल्लेख येतो. अलीकडच्या काळात म्हणजे मागील शतकांतदेखील एक पसायदान मागितलं गेलं. हे पसायदान मागितलं संत राजाराम उपाख्य कैकाडी महाराजांनी. ‘देवा ही माणसे माणसे होवोत’ हे मानवतेचंच पसायदान आहे.

संत राजाराम महाराज यांचं आडनाव जाधव. मात्र कैकाडी महाराज म्हणूनच ते ओळखले जात. राजाराम महाराजांचा जन्म 1904 साली झाला. अहमदनगर जिल्ह्याातील श्रीगोंदे तालुक्यातील कात्राबाद मांडवगण हे त्यांचं जन्मगाव. पौराणिक कथांनुसार या ठिकाणी मांडव्यऋषींचं वास्तव्य होतं. त्यांच्याचं नावावरून या गावाचं नाव मांडवगण झालं अशी लोकांची श्रद्धा आहे.

भागोजी खंडोजी जाधव हे त्या काळातील कॉन्ट्रॅक्टर होते. घरी शेतीवाडीदेखील होती. त्यांची पत्नी रेवूबाई. राजाराम या पहिल्या अपत्यानंतर 1904 साली त्यांना दुसरं अपत्य झालं. त्यांचं नाव कोंडिराम. हे पुढे संत कोंडिराम काका म्हणून प्रसिद्ध झालेत. अत्यंत सधन आणि संपन्न असा हा परिवार होता. या परिवारातील सर्व सदस्य हे श्रद्धाळू होते. त्यांचा आध्यात्माकडे विशेष कल होता. त्यातही परिवारातील ज्येष्ठ चिरंजीव राजाराम यांची आध्यात्मिक ओढ व सामाजिक जाण अत्यंत तीव्र होती. एक दिवस राजाराम यांनी आपल्या परिवाराचा त्याग केला. गृहत्याग करून ते हिमालयात तपश्चर्या करायला गेलेत.

या दरम्यान ते अनेक गावांमध्ये मुक्कामाला राहिले. दिवसा ग्रामस्वच्छता करायची. रात्री गावातील लोकांच्या डोक्यातली घाण स्वच्छ करायची असा त्यांचा नित्यक्रम राहिला. संत गाडगेमहाराजांच्या चरित्रातील अनेक साम्यस्थळं राजाराम महाराजांच्या चरित्रातही आढळतात. त्या काळात भारतीय स्वातंत्र्याचा लढादेखील सुरूच होता. या क्रांतिकारकांनाही ते मार्गदर्शन करायचे. लोकांनाही या चळवळीत उतरण्याचे ते आवाहन करायचे. मजल-दरमजल करीत ते हिमालयात गेलेत. तिथून ते परत आलेत.

एकदा ते पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेलेत. ते सवर्ण नसल्यामुळे त्यांना मज्जाव करण्यात आला. त्यामुळे ते दुखावले. आपल्या लहान भावाला अर्थात कोंडिराम काकांजवळ त्यांनी ही खंत व्यक्त केली. राजाराम महाराजांनी आपल्या भावापुढे एक नवं आणि विशाल स्वप्न मांडलं. जगाच्या नजरेत ते अशक्यप्रायच होतं. सर्व धर्मांतील, जातींतील, समुदाय, पंथ, संप्रदायांतील लोकांना मुक्त प्रवेश मिळावा असं प्रेरणास्थळ त्यांना निर्माण करायचं होतं.

कोणत्याही जाती किंवा धर्माची मक्तेदारी, लेबल अथवा चौकट नसलेलं धाम त्यांना निर्माण करायचं होतं. केवळ वारकरीच नव्हे तर सर्वच धर्मात ईश्वरनामाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच त्यांनी सहस्रकोटीनामाचं ‘विश्वपुण्यधाम’ उभारण्याचा संकल्प केला. ह.भ.प.कोंडिराम काकांच्या परिश्रमांतून आणि लोकसहभागातून तो पूर्णत्त्वास गेला. सहस्र कोटी नाम संकलनाला आरंभ झाला. ज्याची ज्या ईश्वरावर श्रद्धा असेल त्याने त्या ईश्वराचं नाम लिहून पाठवावं असं आवाहन करण्यात आलं. संत कोंडिराम काकांनी यासाठी खूप धडपड केली. संपूर्ण जगभरातून याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि सहस्रकोटी नामाचं ‘विश्वपुण्यधाम’ उभं झालं.

सर्व जाती-धर्मांतील देवतांसह अनेक महामानवांच्या मूर्ती या विश्वपुण्यधामात आहे. याला अनेक लोक कैकाडी बाबांचा मठ, आश्रम म्हणतात. मात्र हा मठ किंवा आश्रम नसल्याचं दारावरच मोठ्या अक्षरांत लिहिलं आहे. या विश्वपुण्यधामात प्रवेश केल्याबरोबर भारतमातेच्या मूर्तीचं दर्शन होतं. आत अनेक मूर्तींसह युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या ऑफीसची प्रतिकृती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पुतळे आहेत. पूर्ण विश्वपुण्यधाम फिरायला व समजून घ्यायला तास-दीड तास लागतो.

या विश्वपुण्यधामाची निर्मिती करणारे ह.भ.प. कोंडिराम काका हे आपल्या जन्मगावातून नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे स्थायिक झालेत. आपला कॉन्ट्रक्टरशीपच्या व्यवसायात जम बसवला होता. आलेल्या संपत्तीसोबतच त्यांची आध्यात्मिक आणि सामाजिक वृत्तीदेखील वाढतच होती. अडल्या-नडल्यांना मदत कर, गरजुंना अन्नदान कर हे कोंडिरामकाकांचं काम अव्याहतपणे सुरूच होतं. पंढरपूला आल्यावरदेखील त्यांचं हे कार्य आजही या विश्वपुण्यधामात सुरूच आहे. इथे रोज गरजूंना अन्नदान होतं. गणराज्यदिन, स्वातंत्र्यदिन, महामानवांच्या जयंती, स्मृतिदिन, विविध सामाजिक उत्सव इथे वर्षभर सुरूच असतात.

संत कोंडिरामकाकांनी 1940 साली जन्मभूमी मांडवगण ते पंढरपूर ही 120 मैलांची यात्रा मार्गावर दंडवत घालत घालत पूर्ण केली. 1947 आणि 1950साली मनमाड ते पंढरपूर या दोनदा दंडवत यात्रा केल्यात. 1959 नंतर मनमाड ते त्र्यंबकेश्वर तीन वेळा दंडवत यात्रा केल्यात. या यात्रेत त्यांच्या पत्नी व चिरंजीव रामदास महाराज सोबत असत. पुढे चालून हेच ह.भ.प. रामदास महाराज या विश्वपुण्यधामाच्या अध्यक्षपदावरून कैकाडी महाराज व कोंडिराम काकांची परंपरा व वारसा चालवत.

संत राजाराम महाराज उपाख्य कैकाडी महाराजांचं आध्यात्मिक क्षेत्रासह सामाजिक योगदानही अत्यंत मोलाचं आहे. समाज आणि आध्यात्माचा संत नामदेव, संत तुकोबारायांचा वारसा यांनी समर्थपणे चालवला. त्यातूनच कैकाडी महाराजांच्या ओठी हे पसायदान आलं. अत्यंत सोप्या शब्दांत ते मागणं मागतात.

देवा ही माणसे माणसे होवोत ।
भरो ओतप्रोत प्रेमभावे ।

भूतमात्री वसो सदा प्रेमभाव ।
वसो प्रीतीगाव ठायी ठायी ।

भेदभावा कुणी न देवो रे थारा ।
दंभाचा तो वारा न लागोगा ।

राष्ट्राराष्ट्रामाजी नांदो मैत्रीभाव ।
संस्कृतीचे नाव राहो सदा ।

सुधान्य शेतीत सुअपत्य पोटी ।
हर्ष कोटी कोटी मिळो जना ।

पसरो भुवरी ज्ञानाचा प्रकाश ।
अज्ञान तमास नुरो ठाव ।

वाको जीव वृक्ष, ज्ञानफळ भारे ।
विनय आचार मिळो जना ।

मिथ्या भक्तीपोटी, नको हिंसाकर्म ।
वैष्णवांचा धर्म वाढो जगी ।

श्रमाची प्रतिष्ठा कळोरे सर्वांसी ।
आळस उदासी नसो देही ।

प्रपंच सवेच परमार्थी भक्ती ।
प्रवृत्ती निवृत्ती राहो दोन्ही ।

देवा पुरवावी माझी ही मागणी।
आस जनी मनी हीच एक।

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.