आयपीएल सुरू, वणीत सट्टा सुरू…

स्थानिक बुकी सक्रीय, सट्याच्या नादापायी अनेक प्रतिष्ठीतांचे दिवाळे

0

विवेक तोटेवार, वणी: 18 सप्टेंबर पासून आयपीएल स्पर्धा सुरू झाली. स्पर्धा सुरू होताच बुकी आणि त्यावर सट्टा खेळणारेही वणीत सक्रीय झाले आहेत. शहरातील विविध भागात हे बुकी सक्रिय आहेत. प्रशासन सध्या कोरोनावर मात करण्यात बिजी असल्याने यात बुकींचे चांगलेच फावत आहे. या सट्ट्याच्या नादात शहरातील अनेक प्रतिष्ठीत बरबाद झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखेर 18 सप्टेंबर शुक्रवार पासून आयपीएल स्पर्धा सुरू झाली. याची प्रतिक्षा केवळ क्रिकेटचे शौकीनांनाच नाही तर त्या संबंधीत बुकींना आणि त्यावर सट्टा खेळणा-यांनाही होती. केवळ मुंबई, पुणे, नागपूरच नाही तर वणी सारख्या शहरातही बुकींचे जाळे पसरले आहे. सोबतच वणीत देखील त्यावर सट्टा खेळणा-यांची संख्या लक्षणीय आहे.

ऑनलाईन सट्टा सुरू
आयपीएलवर चालणारा सट्टा हा मोबाईल व ऑनलाईन चालत असल्याने यात कार्यवाहीची शक्यता कमी असते. त्यामुळे पोलिसांना सुद्धा यांच्या मुसक्या आवळने सहज शक्य होत नाही. पकडल्या जाण्याची रिस्क कमी असल्याने अनेक प्रतिष्ठित लोकं या व्यवसायात गुंतलेले आहेत. यात शहरातील एक डॉक्टरही गुंतल्याची माहितीी आहे. 

हा सट्टा जरी मोबाईल वरून सुरू असला तरी बुकींनी व्यवहारासाठी त्यांचे एक ठिकाण ठेवले आहेत. कुणाची नजर जाणार नाही अशा ठिकाणी हे बस्तान बसविले आहे. शहरात सध्या विराणी टॉकीज परिसर, शास्त्रीनगर, रामपुरा वार्ड, सर्वोदय चौक या ठिकाणावरून हा सट्टा चालत आहे. यात एक व्यक्ती बाहेरगावी राहून हा सर्व व्यवसाय सांभाळत आहे. सर्व व्यवहार मोबाईलवर सुरु असून त्यातच बुकींच्या कर्यालयाच्या ठिकाणी गर्दी होत नसल्याने हा गोरखधंदा बिनदिक्कत सुरू आहे. त्यातच हायप्रोफाईल वस्तीत हा जुगार सहज चालविता येत असल्याने त्याकडे प्रशासनाचेही थोडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या वर्षी छोरीया ले आऊट मधील एका फ्लॅटमध्ये चालणाऱ्या आयपीएल जुगारावर पोलिसांनी धाड टाकून मुद्देमाल जप्त केला होता.

बरबाद झाल्याचे अनेक किस्से शहरात
बुकी हे नेहमीच आपले ठिकाणे बदलवीत असतात. त्यामुळे यांना पकडणे कठीणच आहे. या आयपीएल जुगारामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागले आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वणीच्या एक छोटा राजकीय नेता या जुगारात अडकला होता. त्याच्यावर दीड कोटी रुपये इतकी उधारी बाकी होती. बुकींनी त्याचे घर गाठले. या नेत्याने आपल्या पत्नीला समोर करीत आपली सोडवणूक केली व पैसे देण्याकरिता काही दिवसांची मुदत मागितली. असे अनेक किस्से शहरात आहेत.

टिळक चौकातील एक नावाजलेल्या व्यावसायिकाचा मुलगा या आयपीएल जुगारात फसला. ज्याची वसुली त्याच्या वडिलांना आपली स्थावर मालमत्ता विकून भरून द्यावी लागली. व्यावसायिकांची मुले सोबतच अनेक प्रतिष्ठीत नागरिक यामध्ये बरबाद झाले आहेत.

प्रशासनातील काही कर्मचा-यांची साथ?
प्रशासनाचे काही कर्मचा-यांची या बुकींनी साथ असल्याने कोणतीही भीती न बाळगळा हा गोरखधंदा सुरळीत सुरळीत असल्याचे बोलेले जात आहे. आयपीएल सुरू व्हायच्या पहिलेच याची सर्व सेटिंग झालेली असते. शहरात एका ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या चमूने धाड मारून एक हायप्रोफाईल जुगार पकडला होता. त्याच ठिकाणी आयपीएल जुगारही चालत असल्याची माहिती आहे. परंतु याकडे लक्ष देणार तरी कोण?

कसा चालतोय हा गोरखधंदा… वाचा सविस्तर…. दुसरा भाग लवकरच…

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.