विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कैलासनगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शिरपूर पोलिसांनी (दि.१५) गुरुवारी सायंकाळी धाड टाकली. यात आठ जणांना जुगार खेळतांना अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून रोख डावावरून तीन हजार २९० रुपये, चार दुचाकी, एक स्वीप्ट डिझायर, एकूण किंमत सात लाख ६० हजार, आठ मोबाईल एकूण किंमत २९ हजार ४०० रुपये आणि अंगझडतीत ३१ हजार २७० रुपये असा एकूण आठ लाख २३ हजार ९६० रुपये किंमतीचा मुद्देमाल तसेच खेळातील २५, अन्य २७ पत्ते जप्त केल्याची माहिती शिरपूर पोलिसांनी दिली आहे.
कैलासनगर येथे जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती शिरपूरचे ठाणेदार दीपक पवार यांना भ्रमणध्वनी द्वारे प्राप्त झाली. तेंव्हा पासून जुगार खेळणाऱ्यांवर शिरपूर पोलिस पाळत ठेवून होते. सदर माहितीच्या आधारावर गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान पोलिसांनी कैलासनगर येथील सनरोज वाईनबारच्या मागील पांदण रस्त्यावर छापा टाकला.
यावेळी पत्ता जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यात संजय सातपुते (कैलासनगर), संतोष पिंपळकर (बोरी), रामचंद्र पानघाटे (साखरा), सरोज दत्तक (कैलासनगर), संजय पाल (घुग्गुस), विलास सावे (कोलगाव), अशोक कांबळे ( चंद्रपूर)आणि राजू कटकुरी (घुग्गुस) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही करण्यात आली.
सदर कार्यवाही शिरपूरचे ठाणेदार दीपक पवार, पोलिस उपनिरीक्षक योगेशकुमार दंदे, हवालदार राजू बागेश्वर, योगेश ढाले, अमोल कोवे, अभय मिश्रा, विनोद मोतेकार, अमित पाटील यांनी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगेशकुमार दंदे करीत आहे.