वणीमध्ये कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची जयंती उत्साहात साजरी

बेलदार समाजातर्फे भव्य कार्यक्रमाचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री तथा प्रेरणादायी नेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त वणी येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला. बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था, महिला कार्यकारिणी आणि युवा शहर कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर दादासाहेब कन्नमवार चौकात हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष राकेश बुग्गेवार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पुरुषोत्तमजी कोमरेड्डीवार, ज्ञानेश्वर बोनगीरवार, अमोल बुग्गेवार, दत्ताभाऊ डोहे (वीर भगत सिंग अभ्यासिका संचालक) आणि बेलदार समाज महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षा अल्काताई दुधेवार उपस्थित होत्या.
मान्यवरांनी दादासाहेबांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.

वक्त्यांनी त्यांच्या अल्पकालीन मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीतही महाराष्ट्राच्या विकासात केलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव केला. तळागाळातून उदयास आलेले हे कुशल राजकारणी, हाडाचे पत्रकार, साहित्यिक आणि प्रभावी वक्ते आजही लाखो युवकांना प्रेरणा देतात. दुर्गम चंद्रपूर भागातून कठोर परिश्रमाने मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेली त्यांची जीवनगाथा अजरामर आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी बेलदार समाजाने पुन्हा एकदा जोरदार मागणी केली की, शासनाने कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती व पुण्यतिथीचा शासकीय परिपत्रकात समावेश करावा. दरवर्षी पत्रव्यवहार करूनही दखल न घेतल्याबाबत खंत व्यक्त करताना समाजाने हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन गजानन चंदावार यांनी तर आभार राकेश बरशेट्टीवार यांनी मानले. मोठ्या संख्येने समाजबांधव, पदाधिकारी आणि वणीकर नागरिकांनी उपस्थित राहून सोहळ्याला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.

दादासाहेबांच्या विचारांवर चालत समाजसेवा करणे हेच खरे अभिवादन असल्याचे सर्वांनी एकमताने सांगितले. हा सोहळा प्रेरणादायी ठरला!

Comments are closed.