विलास ताजने (मेंढोली): कवडसी येथे शेतातील गोठ्याला आग लागून एक बैल जळून ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना (दि.१) बुधवारला सायंकाळी सात – साडेसातच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
वणी तालुक्यातील कवडसी (पुनवट) येथे गावाला लागूनच असलेल्या शेतात प्रेमदास काकडे यांचा जनावरांचा गोठा आहे. सायंकाळी गोठयात जनावरे बांधून प्रेमदास घरी आले. काही वेळातच गोठयाला आग लागल्याचे ग्रामस्थांना दिसले. बघताबघता आगीने रौद्ररूप धारण केले. ग्रामस्थांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र हेे प्रयत्न व्यर्थ ठरले.
गोठ्यात जनावराचा कडबा, कुटार आदी वैरण आणि शेतीउपयोगी साहित्याची साठवणूक करून असल्याने आग भडकत गेली. यात प्रेमदास काकडे यांचा एक बैल घटनास्थळी जळून मरण पावला. तर दुसरा साठ ते सत्तर टक्के जळाला. तसेच काकडे यांच्या गोठया शेजारी बंडू देवतळे यांचा गोठा आहे. दोन्ही गोठ्यासह रासायनिक खते आणि अन्य शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाले.
आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. सदर घटनेत काकडे आणि देवतळे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन शेतीच्या खरीप हंगामात घटना घडल्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांपुढे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदर घटनेचा तलाठ्याने पंचनामा केला आहे.