चरित्र आणि चारित्र्य निर्माण हेच ध्येय हवे – विवेक घळसासी

लोकमान्य टिळक स्मृती व्याख्यानमालेत "आज लोकमान्य असते तर ?"या विषयावर निरूपण

0

बहुगुणी डेस्क, वणी: “सर्वसामान्य माणसाच्या अस्मितेला, हक्काला आणि प्रतिष्ठेला जागृत करणारे स्व-राज्य, सात्विकता आणि धेयवृत्तीने भारावलेले शिक्षणक्षेत्र, ज्ञानलालसा लुप्त न होऊ देणारी आर्थिक सुबत्ता, वैचारिक स्वावलंबन देणारी स्वाध्यायवृत्ती, देशहिताशिवाय क्षणभरही विचार न करणारा राष्ट्रीय दृष्टिकोन, तेजस्विता आणि विजिगीषू वृत्ती शिकवणारी धार्मिकता, सज्जनशक्तीच्या हाती असणारे समाजोत्कर्षक राष्ट्रीय उत्सव, समाजघटकांची जागृती, पीडितांबद्दलची कळवळ आणि संघशक्तीची निर्मिती या ध्येयाने झपाटलेली पत्रकारिता अशा प्रत्येक चिंतनातून लोकमान्य टिळकांनी चरित्र आणि चारित्र्यनिर्मिती हेच आपले सगळ्यांचे एकमेव ध्येय असायला पाहिजे हे स्पष्ट केले “असे विचार वक्ता विवेक घळसासी यांनी व्यक्त केले. स्थानिक लोकमान्य टिळक सभागृहामध्ये आयोजित ५४ व्या वर्षीच्या लोकमान्य टिळक स्मृती व्याख्यानमालेत “आज लोकमान्य असते तर ?”या विषयावर ते निरूपण करीत होते .याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष देशमुख यांच्यासह एॅड. लक्ष्मण भेदी, अशोक सोनटक्के आणि प्रा. विजय वाघमारे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य वाघमारे यांनी तर वक्त्यांचा परिचय एॅड. भेदी यांनी करून दिला. “थोडे शिकले आणि मोकाट सुटले “अशा विचित्र पिढीतून निर्माण झालेल्या सगळ्याच क्षेत्रातील सध्याच्या परिस्थितीला पाहून ,”आपण अपात्रांच्या हातामध्ये अमृतकलश दिला “अशी खंत कदाचित लोकमान्यांना वाटू शकते, असे सद्यस्थितीचे आकलन मांडून आपण आहे त्या स्थानी ज्ञानाधिष्ठित आणि राष्ट्रप्रिय विचार चिंतनाच्या माध्यमातून टिळकांना पश्चाताप होऊ नये अशा प्रकारचे स्वतःचे कार्य करत राहणे हा संकल्प त्यानिमित्ताने करावा असे आवाहन घळसासींनी
उपस्थितांना केले.

आपल्या अत्यंत रसाळ, ओजस्वी आणि मनोवेधक व्याख्यानांमध्ये मा. घळसासी यांनी लोकमान्यांच्या विविध गुणांना आणि विविध गोष्टींकडे पाहण्याच्या त्यांच्या स्वतःच्या साहित्यातून प्रकट झालेल्या त्यांच्या दृष्टिकोनांना अधोरेखित केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुभाष देशमुख यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन अशोक सोनटक्के यांनी केले.

लोकमान्य टिळक महाविद्यालय, शिक्षण प्रसारक विद्यालय आणि औषधी निर्माण शास्त्र विभाग या तीनही घटक संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह, शिक्षण प्रसारक मंडळाच्या आजीव सदस्यांसोबत वणीतील विविध गणमान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने या व्याख्यानाचा आनंद घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.