अखिल भारतीय किसान सभेद्वारा बेमुदत ठिय्या आंदोलन

शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नांवर किसान सभा आक्रमक

0

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये अखिल भारतीय किसान सभेतर्फे आज बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरूवात झाली. सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु झाले. यात दुष्काळी सुविधा जाहीर कराव्या, हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान जाहीर करा, संपूर्ण कर्जमाफी करा, पीकविम्याचा लाभ त्वरित द्यावा अशा विविध मागण्या आहेत. कॉ. दिलिप परचाके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे.

सततच्या दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाला आहे. यावर्षीही गंभीर दुष्काळ पडला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या हाती केवळ 25 टक्के पीक आले. त्यामुळे शेतक-यांचा खर्च देखील निघाला नाही. शेतक-यांनी शेतीसाठी कर्ज घेतले आहे. मात्र खर्च देखील न निघाल्याने कर्ज फेडणे शक्य नाही. त्यामुळे नवीन कर्ज मिळण्याचीही शास्वती नाही. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांचे विविध प्रश्न घेऊन किसान सभेद्वारा बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरूवात कऱण्यात आली आहे.

या आंदोलनात पालकमंत्री पांदन रस्ते अंतर्गत शेतीपर्यंत पांदन रस्ता करून द्यावा. शेतीसाठी 24 तास वीज उपलब्ध करून द्यावी. शेतकरी व शेतमजुरांना पेंशन लागू करावी. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी. स्वतंत्र शेती बजेट सादर करावा. उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा असा शेतमालाला भाव द्यावा, जंगली जनावरांपासून पीकांचे संरक्षण करण्यासाठी सौर उर्जेच्या कंम्पाउंडसाठी 90 टक्के अनुदान द्यावे, सुशिक्षित बेरोजगारांना 11 हजार रुपये बेकारी भत्ता द्यावा. अशा अऩेक मागण्या करण्यात आल्या आहेत.

किसान सभेने याआधीही प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र त्यांच्या निवेदनला केराची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळे किसान सभेने यावेळी ठिय्या आंदोलनाचा मार्ग पत्करला. जोपर्यंत एसडीओ जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा घडवून आणत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहिल असा इशारा कॉ. दिलिप परचाके यांनी दिला आहे. या आंदोलनात कॉ. अनिल घाटे, बंडू गोलर, वासूदेव गोहणे, शंकर भगत, अमोल घाटे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी आणि शेतमजूर सहभागी झाले आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.