सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील कोडपाखिंडी येथील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळल्याला एक महिन्याचा कालावधी लोटला. त्यातच शाळेची टिनपत्रे आणि लोखंडी अँगल कंत्राटदाराने घशात घातले असा आरोप करत शाळा सुधार समितीने अभियंता व कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जिल्हा परिषदा शाळेमध्ये सुधारणा करण्यासाठी जिल्हा परिषद निधीतून मान्सून निधी ५ लाख ५० हजार रुपये प्राप्त झाले. शाळा सुधार समिती व ग्रामस्थांनी कोणत्या पद्घतीने बांधकाम करून शाळा दुरुस्त करावी, याबाबत संबधित अभियंता व कंत्राटदाराला सूचना केल्या होत्या. परंतु या सुचनेकडे लक्ष न देता अतिशय जीर्ण झालेल्या भिंतीवर कोणतेही कॉलम न लावता जुन्या विटांच्या भिंतीवर स्लॅब टाकला. परिणामी हा स्लॅब कोसळला.
स्लॅब कोसळला त्यावेळी शाळेचे विद्यार्थी हजर नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शाळा सुरू झाली असून, सध्या मुलांना बसण्यासाठी व्यवस्था नाही. विशेष म्हणजे शाळेवरील काढलेले ५२ टिनपत्रे व ४ लोखंडी ऐंगल सदर कंत्राटदाराने नेले असल्याची तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. .
टक्केवारीची प्रथा कायमच असल्याने निकृष्ठ कामे होत आहे. तालुक्यातील किती शाळांना असा निधी मिळाला आणि कामे कशापद्धत्तीचे झाली, याची तपासणी आता करण्याची गरज निर्माण झाली आहे. सदर कामात अभियंता व कंत्राटदाराने सगणंमत करून निधी हडपण्याचा प्रयत्न केला असल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाइ करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शाळा सुधार समितीच्या अहिल्या गेडाम, बाळू टेकाम, अरविंद खडसे, सुदर्शन मडावी, महादेव सिडाम आदी उपस्थित होते.